
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी नुकतेच तेलुगू व हिंदी भाषेबाबत एक वक्तव्य केले. ते पाहून अभिनेते प्रकाश राज संतापले आहेत. पवन कल्याण यांनी तेलुगू भाषिकांना हिंदी भाषा शिकण्याचे आणि बोलण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर, हिंदी ही देशाला एकत्र बांधणारी भाषा आहे आणि यामुळे प्रादेशिक भाषांना कोणताही धोका नाही, असे त्यांनी म्हटले. मात्र, हे वक्तव्य प्रकाश राज यांना चांगलेच खटकले. त्यांनी पवन कल्याण यांच्यावर राग व्यक्त केला आहे. त्यांनी हे लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.
पवन कल्याण यांनी शुक्रवार, 11 जुलै रोजी हैदराबाद येथे राजभाषा विभागाच्या ‘दक्षिण संवाद’ सुवर्णमहोत्सवी समारंभात हजेरी लावली. त्यावेळी ते म्हणाले की, जर तेलुगू भाषा आपल्यासाठी मातेसमान असेल, तर हिंदी ही आपल्यासाठी मोठ्या मातेसमान आहे. ही भाषा संपूर्ण देशाला एकत्र बांधते. पवन कल्याण यांनी हिंदी भाषेचे आर्थिक महत्त्व अधोरेखित केले आणि प्रादेशिक चित्रपट हिंदीत डब करून पॅन इंडिया प्रदर्शित केले जातात, ज्यामुळे प्रादेशिक चित्रपटांना मोठी कमाई होते, असे सांगितले.
वाचा: पाच वर्षात 13 पटींनी संपत्ती वाढवणारे मंत्री संजय शिरसाट किती कोटींचे मालक?
ఈ range కి అమ్ముకోవడమా ….ఛి…ఛీ… #justasking https://t.co/Fv9iIU6PFj
— Prakash Raj (@prakashraaj) July 11, 2025
हिंदी भाषेबाबत पवन कल्याण काय म्हणाले?
पवन कल्याण यांनी असेही म्हटले की, हिंदी भाषा शिकल्याने कोणत्याही प्रादेशिक भाषेचे महत्त्व कमी होणार नाही. त्यामुळे दक्षिण भारतातील लोकांनी हिंदी भाषा शिकली पाहिजे. तसेच, ते म्हणाले की, त्यांना दक्षिण भारतातील चित्रपट हिंदीत चांगली कामगिरी करून खूप कमाई करावेत असे वाटते. पण त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, हिंदीतून पैसे कमवायचे आहेत, पण ती शिकायची नाही, हा कसला दृष्टिकोन आहे?
पवन कल्याण यांच्यावर प्रकाश राज संतापले
प्रकाश राज यांनी पवन कल्याण यांचा व्हिडीओ एक्स अकाऊंटवर रीट्वीट केला आहे. हा व्हिडीओ रिट्वीट करत लिहिले की, “फक्त विचारतोय. किती किंमतीत स्वतःला विकले? ही लज्जास्पद गोष्ट आहे.”
प्रकाश राज यांनी यापूर्वीही हिंदीवरून पवन कल्याण यांच्यावर निशाणा साधला होता
काही महिन्यांपूर्वीही प्रकाश राज यांनी पवन कल्याण यांच्यावर हल्ला चढवला होता आणि त्यांच्यावर हिंदी भाषा लादण्याचा आरोप केला होता. मे 2025 मध्ये पवन कल्याण यांनी तमिळनाडूच्या नेत्यांनी हिंदी भाषेचा विरोध केल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. यावर प्रकाश राज यांनी ट्वीट केले होते की, पवन कल्याण यांनी आपली हिंदी भाषा आमच्यावर लादू नये, तर ही आमच्या संस्कृती आणि स्वाभिमानाचे रक्षण करण्याची बाब आहे. विशेष म्हणजे, तमिळनाडू, महाराष्ट्र, आसाम आणि आंध्र प्रदेशात हिंदी भाषेवरून वाद वाढत आहे.