Prathamesh Parab: प्रथमेश परबने घेतलं चौथं घर; सायन, अंधेरी, मिरारोडनंतर आता मुंबईतील या भागात साकारलं नवं स्वप्न
एकेकाळी छोट्या भूमिकांमधून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या प्रथमेशने आपल्या मेहनतीच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली. आता आयुष्यातील या नव्या टप्प्यामुळे त्याचा आनंद द्विगुणित झाला आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. ‘टाइमपास’, ‘बालक पालक’ यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या प्रथमेशने पत्नी क्षितिजा घोसाळकर हिच्यासह मुंबईत आणखी एक घर घेतलं आहे. विशेष म्हणजे, प्रथमेशचं हे मुंबईतील चौथं घर असलं, तरी पती-पत्नी म्हणून दोघांनी मिळून पहिल्यांदाच स्वतःचं घर बुक केलं आहे. या नव्या घराची आनंदाची बातमी अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली आहे.
गोरेगावमध्ये घेतलं नवं घर
प्रथमेशने त्याच्या पोस्टमध्ये घराच्या प्रवासाविषयी माहिती दिली आहे. त्याने 2016 मध्ये सायन इथं घर घेतलं होतं. त्यानंतर 2020 मध्ये अंधेरी आणि 2023 मध्ये मीरा रोड इथं घर खरेदी केलं. आता 2026 मध्ये त्याने पत्नी क्षितिजासह गोरेगावमध्ये नवीन घर बुक केलं आहे. त्यामुळे अभिनेत्याच्या घरांची संख्या चार झाली आहे. मात्र, या घराचं महत्त्व त्याच्यासाठी वेगळंच आहे. कारण यापूर्वी घेतलेली घरं आणि पती-पत्नी म्हणून दोघांनी मिळून घेतलेलं पहिलं घर, या दोन गोष्टींमधील भावना वेगळी असल्याचं त्याने सांगितलं.
View this post on Instagram
घर बुक केलं अन् गाडीत बसताच अश्रू अनावर
नवीन घर बुक केल्यानंतरचा भावूक अनुभव प्रथमेशने चाहत्यांसोबत शेअर केला. त्याने लिहिलं की, मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे. मोठं शहर, मोठी स्वप्नं आणि स्वतःचं हक्काचं घर असावं, असं स्वप्न त्यांनीही पाहिलं होतं. घर बुक केल्यानंतर बाहेर येऊन गाडीत बसताच त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हा आनंद केवळ नवीन घर मिळाल्याचा नव्हता, तर दोघांनी मिळून पाहिलेलं एक स्वप्न सत्यात उतरण्याच्या दिशेने पहिलं पाऊल पडलं होतं, याचं समाधान होतं.
प्रथमेशने पोस्टमध्ये पुढे सांगितलं की, अद्याप त्यांना घराचा ताबा मिळालेला नाही. घराच्या चाव्या हातात येणं, आपल्या आवडीनुसार प्रत्येक कोपरा सजवणं आणि त्या घरात असंख्य आठवणी तयार करणं, या सगळ्याची दोघांना उत्सुकता आहे. घर कितवं आहे यापेक्षा ते कोणाबरोबर आणि कोणत्या भावनेने घेतलं आहे, हे अधिक महत्त्वाचं असल्याचंही त्याने नमूद केलं. दिवाळीच्या रोषणाईसोबतच त्यांच्या आयुष्यात एका नव्या स्वप्नाचा प्रकाश आला असल्याची भावना त्याने व्यक्त केली. प्रथमेश आणि क्षितिजाच्या या आनंदाच्या बातमीवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांच्या नव्या घराचं स्वप्न लवकरच पूर्ण व्हावं, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
