हा प्रसिद्ध अभिनेता लिहिणार ‘चला हवा येऊ द्या’चे स्किट्स; परफॉर्मही करणार

'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कॉमेडी शोचं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या पर्वाची थीमसुद्धा हटके असून त्यात आधीचे काही कलाकार झळकणार आहेत. या पर्वाचं स्किट एक प्रसिद्ध अभिनेता लिहिणार आहे.

हा प्रसिद्ध अभिनेता लिहिणार चला हवा येऊ द्याचे स्किट्स; परफॉर्मही करणार
ओळखलंत का अभिनेत्याला?
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 22, 2025 | 11:52 AM

‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोचं नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कॉमेडीचं गँगवॉर’ अशी या पर्वाची नवीन थीम आहे. यामध्ये श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, गौरव मोरे, भारत गणेशपुरे यांसारखे कलाकार झळकणार आहेत. त्यांच्यासोबत एक लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेतासुद्धा परफॉर्म करणार आहे. या बहुरंगी कलाकाराने चित्रपट, रंगमंच आणि वेब सीरिज अशा विविध माध्यमांतून आपली खास छाप पाडली आहे. हाच कलाकार ‘चला हवा येऊ द्या’ची स्किट लिहिणार आहे. या कलाकाराचं नाव आहे प्रियदर्शन जाधव. अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन अशा तिन्ही क्षेत्रांत यशस्वी कारकीर्द घडवलेला प्रियदर्शन आता पुन्हा आपल्या हास्याच्या मेजवानीसाठी सज्ज आहे.

याविषयी प्रियदर्शन म्हणाला, “जेव्हा ‘फु बाई फु’ सुरु होतं, तेव्हापासूनच मी या टीमचा भाग होतो. पण काही कारणामुळे मला तो प्रवास पुढे नेता आला नव्हता. पण जेव्हा मला ‘चला हवा येऊ द्या’च्या नवीन पर्वासाठी विचारण्यात आलं. तेव्हा वाटलं की मी पुन्हा घरी परतत आहे. तयारीबद्दल बोलायचं झालं तर या शोची काही प्रमाणात दिग्दर्शनाची जबाबदारी माझ्यावर आहे. मी काही स्कीटदेखील लिहिणार आहे आणि अभिनयसुद्धा करणार आहे. अर्थात प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा असणार. कारण दहा वर्षे या शोने संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन केलंय. आताही प्रेक्षकांची तीच अपेक्षा असणार. किंबहुना काही वेगळं ही अपेक्षित असेल. ते पूर्ण करायचा प्रयत्न आम्ही करू.”

“या पर्वात आम्ही एकटे नसणार, तर आमच्यासोबत काही उदयोन्मुख हास्य कलाकार असतील. जे महाराष्ट्राच्या विविध भागातून या मंचावर आले आहेत. या शोचे अस्सल स्टार ते असणार आहेत. या पर्वात माझी भूमिका तिहेरी भूमिका असणार आहे. मी दिग्दर्शनही पाहणार, स्पर्धकांचे स्कीटही बघणार आणि परफॉर्मही करणार आहे. पण हे सगळं मी एकटा करणार नसून माझ्यासोबत आणखी काही प्रतिभाशाली लेखक आणि दिग्दर्शक असणार आहेत. आम्ही सर्व मिळून काम करणार आहोत. शूटचा पहिला दिवस धमाकेदार होता. भारत, श्रेया, कुशल, गौरव सोबत मज्जा आली. मी कुशलसोबत नाटकात काम केलंय, श्रेयाने माझ्या वेब सीरिजमध्ये काम केलंय, भारतने माझ्या नाटकात काम केलंय. गौरवसोबत काम करण्याचा योग नव्हता, पण ती संधी या शोमुळे मिळाली,” असं तो पुढे म्हणाला.

‘चला हवा येऊ द्या- कॉमेडीचं गँगवॉर’ हा कार्यक्रम येत्या 26 जुलैपासून शनिवारी आणि रविवारी रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.