‘चला हवा येऊ द्या’च्या नवीन सूत्रसंचालकाची प्रेक्षकांनी ही विनंती; म्हणाला ‘मला दडपण..’
'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोचा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनचा सूत्रसंचालकसुद्धा नवीन आहे. निलेश साबळेच्या जागी एक लोकप्रिय अभिनेता या सिझनचं सूत्रसंचालन करणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय कार्यक्रम एका नव्या अंदाजाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या सिझनची थीम वेगळी आहे आणि त्याचा सूत्रसंचालकसुद्धा नवीन आहे. ‘चला हवा येऊ द्या 2’चं सूत्रसंचालन निलेश साबळे करणार नसून अभिनेता अभिजीत खांडकेकर करणार आहे. त्याचप्रमाणे यामध्ये श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, गौरव मोरे आणि प्रियदर्शन जाधव या कलाकारांचा समावेश असेल. या नव्या प्रवासाविषयी अभिजीतने भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याने प्रेक्षकांना एक विनंतीदेखील केली आहे.
अभिजीत म्हणाला, “झी मराठीसोबतचं माझं नातं अगदी माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमातून मी आणि माझ्यासारखे अनेक कलाकार या क्षेत्रात आलो आणि आजपर्यंत काम करत आहोत. त्यात ‘चला हवा येऊ द्या’सारख्या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमासाठी जेव्हा मला विचारलं, तेव्हा तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता. मुळात मला निवेदनाची प्रचंड आवड आहे, त्यामुळे मी ही संधी एक चॅलेंज म्हणून घेत आहे. कारण गेली 10 वर्षे ज्या पातळीवर हा कार्यक्रम नेऊन ठेवला आहे, त्या टप्प्यावरून तो अजून पुढे नेणं हे खरंच आव्हानात्मक आहे.”
“प्रेक्षकांना आधीच्या पर्वाप्रमाणेच या पर्वातूनही तेवढीच किंबहुना त्यापेक्षा अधिक अपेक्षा आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. पण मला त्याचं दडपण निश्चित नाही. आधीच्या कुठल्याच पर्वाचं बॅगेज (ओझं) माझ्यावर नसल्यामुळे मी माझ्या पद्धतीने नवीन सुरुवात करणार आहे. मी या सिझनसाठी प्रचंड उत्साही आहे. या नवीन पर्वात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक स्पर्धक सहभागी होणार आहेत. जिथे जिथे ऑडिशन्स झाले, तिथून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या सगळ्या मंडळींना ‘चला हवा येऊ द्या मंचा’चा स्पर्श होणार आहे आणि या निमित्ताने काही नवीन हास्य कलाकार महाराष्ट्राला मिळणार आहेत आणि त्या कलाकारांच्या करिअरला एक दिशा मिळणार आहे,” असं त्याने पुढे सांगितलं.
View this post on Instagram
‘चला हवा येऊ द्या’च्या टीमसोबत कशी बाँडिंग आहे, याविषयी तो म्हणाला, “संपूर्ण टीमसोबत माझं बाँडिंग फार छान आहे. कारण मी आधीपासूनच त्यांना भेटत आलो आहे. श्रेया, कुशल, गौरव, प्रियदर्शन आणि भरत दादा या सर्वांसोबत छान संवाद होतो. आतापर्यंत मी एक प्रेक्षक म्हणून हे सगळं अनुभवत होतो पण आता एक निवेदक म्हणून त्या टीमचा भाग म्हणून आणखी मज्जा येईल.”
यावेळी अभिजीतने प्रेक्षकांना खास विनंती केली. तो म्हणाला, “प्रेक्षक हेच आमचे मायबाप आहेत. त्यांच्याकडून इतकीच अपेक्षा आहे की जितकं प्रेम या आधीच्या पर्वांना दिलं, तितकंच भरभरून प्रेम या पर्वालाही द्यावं. यंदा या पर्वातून महाराष्ट्राला अनेक नवीन हास्यकलाकार मिळणार आहेत. यावेळीच ‘चला हवा येऊ द्या’ नवीन प्रकारे सादर होणार आहे आणि हे नवीन बदल प्रेक्षकांना नक्की आवडतील याचीही काळजी घेतली आहे. माझं हेच म्हणणं आहे की दहा वर्षे प्रेम देऊन या कार्यक्रमाला इतक्या मोठया शिखरावर नेऊन ठेवलं. तेच प्रेम आणि आशीर्वाद प्रेक्षकांकडून या पर्वासाठी अपेक्षित आहे.” हा नवीन सिझन येत्या 26 जुलैपासून शनिवारी आणि रविवारी रात्री 9 वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
