प्रियांका चोप्रा निक जोनाससह पोहोचली अयोध्येत; मुलीसोबत घेणार रामलल्लाचं दर्शन

अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरीसह अयोध्येला पोहोचली आहे. या तिघांसोबत प्रियांकाची आई मधू चोप्रासुद्धा आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या दर्शनासाठी हे सर्वजण अयोध्येला पोहोचल्याचं समजतंय.

प्रियांका चोप्रा निक जोनाससह पोहोचली अयोध्येत; मुलीसोबत घेणार रामलल्लाचं दर्शन
Priyanka Chopra and Nick Jonas
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 20, 2024 | 3:32 PM

अयोध्या : 20 मार्च 2024 | बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा पती निक जोनाससोबत अयोध्येला पोहोचली आहे. प्रियांका आणि निक यांच्यासोबत त्यांची मुलगी मालती मेरीसुद्धा आहे. यावेळी प्रियांकाने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. तर निक जोनासने कुर्ता परिधान केला होता. अयोध्येतील राम मंदिरातं रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी प्रियांका आणि निक तिथे पोहोचले आहेत. अयोध्या एअरपोर्टवरील त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी त्यांच्यासोबत प्रियांकाची आई डॉ. मधू चोप्रासुद्धा होत्या. सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणासुद्धा ऐकू येत आहेत.

जानेवारी महिन्यात अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता. त्यावेळी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, कतरिना कैफ, रजनीकांत यांसारखे अनेक सेलिब्रिटी सोहळ्याला उपस्थित होते. मात्र त्यावेळी प्रियांका भारतात नव्हती. काही दिवसांपूर्वीच ती भारतात परतली आहे. गुरुवारी रात्री मुलीसोबत भारतात आल्यानंतर तिने मुंबईतल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. प्रियांका ही Bvlgari या जगप्रसिद्ध ब्रँडची अॅम्बेसेडर असल्याने मुंबईतल्या स्टोअर लाँचसाठी ती उपस्थित होती. त्यानंतर ईशा अंबानीकडून आयोजित प्री-होळी पार्टीलाही तिने हजेरी लावली होती.

प्रियांका भारतात आल्याच्या दोन दिवसांनंतर निकसुद्धा भारतात आला. या दोघांनाही रितेश सिधवानीच्या पार्टीत पाहिलं गेलं. मंगळवारी प्रियांकाने मुंबईतल्या आणखी एका कार्यक्रमात हजेरी लावली आणि त्यानंतर निकसह ती अयोध्येसाठी रवाना झाली. लग्नानंतर प्रियांका परदेशात स्थायिक झाली असली तरी कामानिमित्त ती अनेकदा भारतात येते. किंबहुना परदेशात असतानाही ती कधीच भारतीय संस्कार विसरली नाही, याची प्रचिती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून येते. पती निक आणि मुलगी मालतीसोबत ती अनेकदा पूजा, देवाची अर्चना करताना दिसून येते.

प्रियांकाच्या धार्मिक गोष्टीत निकसुद्धा तितकाच आदराने सहभागी होत असल्याचं अनेकदा पहायला मिळतं. नुकतंच या दोघांनी मुलगी मालती मेरीचा दुसरा वाढदिवस साजरा केला होता. या वाढदिवशी सर्वांत आधी प्रियांका तिच्या लाडक्या लेकीला मंदिरात देवदर्शनासाठी घेऊन गेली होती. त्याचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.