
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. आता लवकरच ती एस. एस. राजामौली यांच्या ‘वाराणसी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यादरम्यान प्रियांकाचा शाळेतल्या दिवसांतला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो तेव्हाचा आहे, जेव्हा प्रियांका अमेरिकेतील शाळेत शिक्षण घेत होती. तिच्या एका शाळेतल्या मैत्रिणीनेच सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. प्रियांकाच्या या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. इतकंच नव्हे तर तिच्या एक्स बॉयफ्रेंडनेही या फोटोवर कमेंट केली आहे.
प्रियांकाचा जन्म बरेलीमध्ये झाला होता. निक जोनासशी लग्नानंतर ती परदेशात स्थायिक झाली असली तरी भारतीय परंपरांशी ती आजही तितकीच जोडली गेली आहे. प्रियांकाने सुरुवातीचा काही काळ अमेरिकेत घालवला होता. यादरम्यान ती इंडियानामध्ये राहिली आणि तिथेच शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. भारतात परतल्यानंतर प्रियांकाने सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला.
आता प्रियांकाच्या शाळेतल्या एका मैत्रिणीने तिचा हा कधीच न पाहिलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तेव्हा प्रियांका फक्त 14 वर्षांची होती. या फोटोमध्ये प्रियांका शाळेतल्या बेंचवर बसलेली दिसून येत आहे. तिच्या हातात पेन आणि पुस्तक आहे. ब्लॅक टँक टॉप आणि त्यावर शर्ट असा तिचा लूक आहे. ‘तुम्हा सर्वांना आठवतंय का की, प्रियांका चोप्राने आपल्यासोबत फ्रेशमॅन इअरची सुरुवात केली होती?’, असं कॅप्शन देत मैत्रिणीने हा फोटो शेअर करताच त्यावर इतरांनीही कमेंट्स देण्यास सुरुवात केली. तेव्हा प्रियांका नववीत होती आणि आता तिचा हा फोटो रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चर्चेत आला आहे.
या फोटोवर प्रियांकाच्या एक्स बॉयफ्रेंडनेही कमेंट केली आहे. त्याने लिहिलं, ‘आम्ही त्यावेळी एकमेकांना डेट करत होतो. त्यानंतर ती बोस्टनला गेली. ती प्रेसिडेन्शियल इस्टेटमध्ये राहत होती. तेसुद्धा काय दिवस होते! प्रियांकाच्या गळ्यात मी दिलेला नेकलेस आहे.’ ही कमेंट वाचून प्रियांकाच्या चाहत्यांमध्ये आणखीनच उत्सुकता निर्माण झाली. इंडियानामध्ये शालेय दिवसांत प्रियांकाला बास्केटबॉल खेळायला खूप आवडायचं. तिच्याबद्दल अशाच काही नवीन गोष्टी चाहत्यांना समजल्या. प्रियांकाने इंडियाना पोलीसच्या नॉर्थ सेंट्रल हायस्कूलमधून शिक्षण घेतलं होतं.