Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत मोठा अपघात, थोडक्यात बचावली
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत मोठा अपघात घडला आहे. या अपघातातून ती थोड्यात बचावली आहे. आता नेमकं काय झालं चला जाणून घेऊया...

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने नाव कमावल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून हॉलिवूडच्या प्रकल्पांमध्ये यश मिळवत आहे. प्रियांकाने हॉलिवूड इंडस्ट्रीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. तिने आपल्या कामाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना आपले चाहते बनवले आहे. जागतिक आयकॉन बनलेली प्रियांका आता हॉलिवूड प्रकल्पांसाठी मोठी फी आकारते. त्याचबरोबर भारतीय चित्रपटसृष्टीत परत येण्याबाबतही ती खूप चर्चेत आहे. नुकतेच प्रियांकाने तिच्या आगामी चित्रपट हेड्स ऑफ स्टेट (Head of State) च्या शूटिंगदरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला. या सेटवर ती थोडक्यात वाचली आहे.
चॅट शोमध्ये सांगितला किस्सा
प्रियांका चोप्राचा आगामी चित्रपट हेड्स ऑफ स्टेट (Head of State) लवकरच प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्रीने तिच्या चित्रपटाचे प्रमोशनही सुरू केले आहे. याच दरम्यान तिने तिचे सह-कलाकार जॉन सीना आणि इदरीस एल्बा यांच्यासोबत जिमी फॉलनच्या चॅट शो द टुनाइट शोमध्ये हजेरी लावली. अभिनेत्रीने यावेळी चित्रपटाच्या सेटवर तिच्यासोबत घडलेल्या एका मोठ्या अपघाताबद्दल खुलासा केला. तिने सांगितले की, शूटिंगदरम्यान तिची भुवई कापली गेली होती.
शूटिंगदरम्यान भुवईवर दुखापत
प्रियांका चोप्राने सांगितले, “कॅमेऱ्यात मॅट बॉक्स होता आणि मला जमिनीवर लोळत पडायचे होते. पाऊस पडत होता. कॅमेरा माझ्या जवळ येणार होता.” देसी गर्लच्या म्हणण्यानुसार, शूटिंगदरम्यान तिला क्लोज शॉट द्यायचा होता आणि कॅमेरा ऑपरेटर काही जास्तच जवळ आला. तीही कॅमेऱ्याच्या थोड्या जास्त जवळ गेली. त्यामुळे कॅमेऱ्याचा कोपरा तिच्या भुवईला लागला आणि तिची अर्धी भुवईच कापली गेली. अभिनेत्रीने याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली की भुवईच्या जागी तिचा डोळा असता तर मोठा अपघात झाला असता. त्यामुळे ती खूप आभारी आहे. तिने आपले काम पूर्ण केले, कारण तिला पुन्हा पावसात शूटिंग करायचे नव्हते.
या दिवशी पाहता येणार प्रियांकाचा चित्रपट
अभिनेत्रीचा आगामी हेड्स ऑफ स्टेट हा एक ॲक्शन-कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर 2 जुलै रोजी स्ट्रीम होणार आहे. प्रियांका या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तसेच, ती लवकरच दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली आणि महेश बाबू यांच्या SSMB29 मध्ये दिसणार आहे.