
गेल्या वर्षी ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी 23 जणांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये ‘पुष्पा’ स्टार अल्लू अर्जुनचाही समावेश आहे. या आरोपपत्रात थिएटर व्यवस्थापनाला मुख्य आरोपी म्हणून नाव देण्यात आलं आहे. तर अल्लू अर्जुनला आरोपी क्रमांक 11 म्हणून नाव देण्यात आलं आहे. 4 डिसेंबर 2024 रोजी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’च्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तर तिचा आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला होता. याप्रकरणी अल्लू अर्जुनलाही अटक करण्यात आली होती. चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. या प्रीमिअरला जेव्हा अल्लू अर्जुन पोहोचला, तेव्हा थिएटरबाहेर चेंगराचेंगरी झाली होती. त्यात एम. रेवती नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मृत महिलेच्या कुटुंबीयांनी अल्लू अर्जुनविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली अल्लू अर्जुन, त्याच्या सुरक्षा पथकावर आणि थिएटर व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 13 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर 14 डिसेंबर 2024 रोजी त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. त्यानंतर त्याला नियमित जामीन मंजूर करण्यात आला होता. अल्लू अर्जुन कोणतीही पूर्वसूचना न देता त्याठिकाणी आल्याने चाहत्यांची गर्दी वाढली आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली, असा आरोप पोलिसांनी केला होता.
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अल्लू अर्जुन आणि ‘पुष्पा 2’च्या निर्मात्यांनी पीडित महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली होती. याशिवाय तेलंगणा सरकारनेही कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली होती. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेत त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. “माझ्या आयुष्यातील ही सर्वांत खालच्या पातळीची गोष्ट आहे. मलाही त्याच वयाचा मुलगा आहे. मी वडील नाही का? एका पित्याला काय वाटत असेल हे मी समजू शकत नाही का”, असं म्हणत तो पत्रकार परिषदेत भावूक झाला होता.