चार पैसे कमावल्यावर तिच्या डोक्यात हवा गेली.. ती अशिक्षित; श्वेता तिवारीवर भडकला पूर्व पती
अभिनेत्री श्वेता तिवारी अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली. श्वेताने अभिनेता राजा चौधरीशी पहिलं लग्न केलं होतं. घटस्फोटादरम्यान तिने राजावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. आता राजा त्या आरोपांवर व्यक्त झाला.

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीचा पूर्व पती राजा चौधरी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. राजाला घटस्फोट देताना श्वेताने त्याच्यावर शारीरिक शोषणाचे आरोप केले होते. या आरोपांवर त्याने स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नव्हे तर तो श्वेताला ‘अशिक्षित’ असंदेखील म्हणाला आहे. “जर मला संधी मिळाली तर मी श्वेताला विचारू इच्छितो की पोलिसांकडे न जाता आधी आमच्यातील वाद सोडवण्याचा प्रयत्न का केला नाही”, असा सवाल राजाने या मुलाखतीत विचारला आहे. राजा आणि श्वेता यांचं जरी लव्ह-मॅरेज असलं तरी विभक्त होताना त्यांच्यातील कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला होता. या दोघांनी एकमेकांवर बरेच आरोप केले होते.
श्वेता घरातली कमावणारी व्यक्ती होती आणि तू मुलीकडे लक्ष देत होतास का, असं विचारलं असता राजा म्हणाला, “तुम्ही असं म्हणू शकता. त्यावेळी ती जास्त पैसे कमवत होती आणि मी कमी कमवत होतो. मीसुद्धा काम करत होतो, पण त्याने काही फरक पडतो का? पुरुष आयुष्यभर पैसे कमवत असतो, पण जेव्हा महिला पैसे कमावू लागते, तेव्हा तिला ते तिचे पैसे वाटू लागतात. पुरुष कधीच म्हणत नाही की हे माझे पैसे आहेत. महिलेचे पैसे महिलेचे असतात, अजब फरक आहे. मग बोललं जातं की खांद्याला खांदा लावून चालणार, बरोबरी करणार, अरे बरोबरीच्या लायक कुठे आहात? चार पैसे पाहून तुमची नियत बदलली.”
View this post on Instagram
पूर्व पत्नी श्वेतावर टीका करत तो पुढे म्हणाला, “तिने पैसे पाहिले नव्हते, लहानपणापासून ती गरीबीत जगली, चाळीत राहिली. त्यामुळे अचानक पैसे आल्यावर लोकांचं डोकं खराब होतं. तिने काही शिक्षण तर घेतलं नाही, अशिक्षित तर तशीच आहे, खोटं आयुष्य जगतेय. मग जेव्हा तुम्ही काम करू लागता, तेव्हा ती व्यक्ती तशीच राहत नाही. ती बिझनेस वुमन झाली. ती म्हणाली, मी कमावलंय.. हे माझे पैसे आहेत. तू काय कमावलंस? तू या पृथ्वीवर एकटीच आलीस का? मला हेच समजत नाही की कुटुंबात कोणतीही व्यक्ती असं कसं म्हणू शकते की, हे माझे पैसे आहेत. हे आपले पैसे आहेत. पण जर तिची विचार करण्याची क्षमता इतकीच असेल तर कोणी काय करू शकतं?”
राजा चौधरी आणि श्वेता तिवारीने 1998 मध्ये लग्न केलं. 2000 मध्ये श्वेताने मुलीला जन्म दिला. लग्नाच्या नऊ वर्षांनंतर 2007 मध्ये श्वेताने घटस्फोटासाठी अर्ज केला. तेव्हा श्वेताने राजावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. 2012 मध्ये हे दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले. तेव्हापासून मुलगी पलक श्वेतासोबतच राहते.
