राजेश खन्ना या अभिनेत्रीसोबत 7 वर्षे राहिले होते लिव्ह-इनमध्ये; लहान कपडे घालण्याच्या विरोधात खूप केलं टॉर्चर

राजेश खन्ना हे बॉलिवूडचे सुपरस्टार तर होतेच पण सोबतच त्यांच्या अफेअरच्या चर्चाही तेवढ्याच झाल्या. ते एका अभिनेत्रीसोबत 7 वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिले होते. पण त्यांच्या स्वभावामुळे त्यांचं नातं लग्नापर्यंत जाऊ शकलं नाही असं त्या अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलं. तसेच राजेश खन्ना त्या अभिनेत्रीला कोणत्या गोष्टीसाठी टॉर्चर करायचे हे देखील त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

राजेश खन्ना या अभिनेत्रीसोबत 7 वर्षे राहिले होते लिव्ह-इनमध्ये; लहान कपडे घालण्याच्या विरोधात खूप केलं टॉर्चर
Rajesh Khanna & Anju Mahendru
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 07, 2025 | 2:40 PM

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार आहेत ज्यांनी 40 वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम केले. ते चित्रपटांमध्ये जितके रोमँटिक होते तितक्याच खऱ्या आयुष्यातही होते. आजही जेव्हा त्यांची आठवण काढली जाते तेव्हा त्यांचे अनेक किस्से सांगितले जातात. राजेश खन्ना जसे त्यांच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध होते. मोठे स्टार होते. तेवढीच चर्चा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची झाल, त्यांच्या अफेअर्सची चर्चा झाली.

मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले अन् …

राजेश खन्नांचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं ज्यांच्या अफेअरच्या चर्चा आजही होतात. ती अभिनेत्री डिंपल कपाडिया नव्हत्या तर अंजू महेंद्रू होत्या. राजेश खन्ना आणि अंजू यांची प्रेमकहाणी बॉलिवूडध्ये अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहे. अंजू आणि राजेश बालपणीचे मित्र होते. दोघेही एकाच कॉलेजमध्ये एकत्र शिकले. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते एकत्र राहू लागले. ही गोष्ट त्या काळाची आहे जेव्हा राजेश चित्रपटांमध्ये काम मिळविण्यासाठी संघर्ष करत होते. त्या काळात अंजू देखील एक मॉडेल होती आणि अभिनयासाठी प्रयत्न करत होती.

त्यांच्या नात्यातील सुरुवातीच्या काळात, राजेश अंजूची खूप काळजी घ्यायचे. अंजू यांनी देखील राजेश खन्नांच्या करिअरसाठी तिची स्वप्ने बाजूला ठेवली. हळूहळू, इंडस्ट्रीत राजेश खन्ना यांचं नाव प्रसिद्धीस येऊ लागलं. तेव्हा राजेश खन्ना यांनी अंजूची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. जेव्हा राजेशला यश मिळू लागले, तेव्हा त्यांनी अंजूला तिचे करिअर सोडण्यास सांगितले.

राजेश यांच्या सांगण्यावरून त्यांनी त्यांचे करिअरही सोडले

अंजू राजेश खन्ना यांच्या प्रेमात वेड्या होत्या. राजेश यांच्या सांगण्यावरून त्यांनी त्यांचे करिअरही सोडले आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करू लागली. दोघेही एकाच घरात राहत होते. राजेश खन्ना आणि अंजू हे 7 वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिले. अंजू घरातील सर्व कामे सांभाळत असे आणि राजेश खन्ना चित्रपटांमध्ये व्यस्त होते. राजेश यांचे चित्रपट एकामागून एक हिट होत होते. पण काही काळानंतर त्यांच्या नात्यात तडा जाऊ लागला

आमच्या नात्यात नेहमीच गोंधळ असायचा

एका मुलाखतीत अंजू यांनी त्यांच्या नात्याबद्दल स्पष्टच सांगितलं. अंजूने सांगितले की, ‘तो खूप जुन्या पद्धतीचा होता. आमच्या नात्यात नेहमीच गोंधळ असायचा. जेव्हा मी स्कर्ट घालायचो तेव्हा तो म्हणायचा की तू साडी का घालत नाहीस. जेव्हा मी साडी घालायचे तेव्हा तो म्हणायचा की तू साडी का घालतेस? तू स्वतःला भारतीय महिला म्हणून का सादर करण्याचा प्रयत्न करतेस. यामुळे आमच्यात नेहमी भांडणे होत असतं. आणि हेच नंतर आमचं नातं तुटण्याचे कारण बनलं.’

मुलाखतीत अंजू पुढे म्हणाल्या ‘त्याचा एखादा चित्रपट फ्लॉप झाला की तो लगेच रागावायचा. तो अस्वस्थ असायचा. तो छोट्या छोट्या गोष्टींवर राग काढायचा. तो खूप काळजी करायचा. दुसरीकडे राजेशला वाटायचे की मी त्याला वेळ देत नाहीये.’


ती तिच्या मैत्रिणींसोबत मजा करत असायची…

दरम्यान राजेश खन्ना यांनीही एका मुलाखतीत आपली ही वेदना व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, ‘दिवसभर स्टुडिओमध्ये घालवून मी घरी येतो तेव्हा मला एक चिठ्ठी सापडते ज्यामध्ये लिहिलेले असायचे की मी एका पार्टीला जात आहे. मला तिच्यासोबत वेळ घालवायचा असायचा. पण ती तिच्या मैत्रिणींसोबत मजा करत असायची.’

अंजू यांनी पुढे असेही सांगितले की, “राजेश खन्ना यांनाही असे वाटायचे की मी त्यांच्या आईसोबत वेळ घालवू. पण आधी राजेशची त्यानंतर पुन्हा त्यांच्या आईची काळजी घेणं मला शक्य नव्हतं. मी फक्त एका सुपरस्टारला खूश करण्याचे साधन बनले होते. मी राजेशसाठी माझे करिअर पणाला लावले होते. मला मॉडेलिंगसाठी सर्वात जास्त फी मिळत असे. तो मला संजीव कुमारसोबतही चित्रपटही करू देत नव्हता. जरी मला तो करायचा असायचा तरीही. राजेशला गृहिणी हवी होती.’ असं म्हणत त्यांनी त्यांची खंत व्यक्त केली होती.

ब्रेकअपनंतर राजेश खन्ना यांना तिचा बदला घ्यायचा होता

दरम्यान असेही म्हटले जाते की, ब्रेकअपनंतर राजेश खन्ना यांना तिचा बदला घ्यायचा होता. म्हणून राजेशने अंजूला कास्ट करणाऱ्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना दुप्पट किंमत दिली आणि अंजूची जाहिरात फिल्म आणि चित्रपट त्याला विकण्यास सांगितले. जेणेकरून हे चित्रपट कधीही प्रदर्शित होऊ नयेत. अंजूला धडा शिकवण्यासाठी राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडियाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाही तर लग्नाच्या दिवशी राजेश खन्ना यांनी त्यांची वरात देखील अंजू यांच्या घराखालून वाजतगाजत नेली होती.