Rajinikanth Jailer | रजनीकांत यांच्या ‘जेलर’ने ‘गदर 2’लाही भरली धडकी; ऑफिसमध्ये थेट सुट्ट्या जाहीर

सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटाची आतापर्यंत 1 लाख 70 हजार तिकिटं विकली गेली आहेत. तर 'जेलर'ची ॲडव्हान्स बुकिंग 2 लाख 30 हजार इतकी झाली आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही या चित्रपटाची प्रचंड क्रेझ पहायला मिळतेय.

Rajinikanth Jailer | रजनीकांत यांच्या जेलरने गदर 2लाही भरली धडकी; ऑफिसमध्ये थेट सुट्ट्या जाहीर
Jailer Movie
Image Credit source: Youtube
| Updated on: Aug 08, 2023 | 2:53 PM

मुंबई | 8 ऑगस्ट 2023: ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा हा चित्रपटप्रेमींसाठी भरभरून मनोरंजनाचा असणार आहे. कारण येत्या शुक्रवारी म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हे दोन्ही चित्रपट नव्वदच्या दशकातील मोठ्या स्टार्सचे आहेत. या दोन्ही कलाकारांची नावं ऐकली तरी आजही चाहते फार उत्सुक होतात. विशेष म्हणजे हे दोन्ही सीक्वेल चित्रपट आहेत. एका बाजूला सनी देओलचा ‘गदर 2’ आहे, तर दुसऱ्या बाजूला अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड 2’ आहे. सनीच्या चित्रपटासाठी चाहत्यांनी 22 वर्षे आणि अक्षयच्या चित्रपटासाठी 11 वर्षे वाट पाहिली आहे. मात्र या दोघांच्याही आधी थिएटरमध्ये असा सुपरस्टार येतोय, ज्याच्या चित्रपटाचं प्रदर्शन म्हणजे चाहत्यांसाठी जणू एखादा उत्सवच.

‘थलायवा’ रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन वर्षांच्या ब्रेकनंतर ते मोठ्या पडद्यावर येत आहेत. त्यांचा लूक, त्यांची स्टाइल, कॉमेडी, ॲक्शन, डान्स अशा सर्वच गोष्टी पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. या चित्रपटाचं जोरदार ॲडव्हान्स बुकिंग सुरू आहे. प्रदर्शनाच्या सहा दिवस आधीच एक लाखांहून अधिक तिकिटं विकली गेली आहेत. ‘गदर 2’ची लिमिटेड ॲडव्हान्स बुकिंग गेल्या रविवारी सुरू झाली होती. तर बुधवारपासून संपूर्ण बुकिंग सुरू करण्यात आली. मात्र ‘जेलर’ची ॲडव्हान्स बुकिंग शनिवारी, 5 ऑगस्टपासून सुरू झाली. रजनीकांत यांच्या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ आहे, की उशिरा बुकिंग सुरू होऊनही या चित्रपटाने ‘गदर 2’ला मागे टाकलं आहे.

सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाची आतापर्यंत 1 लाख 70 हजार तिकिटं विकली गेली आहेत. तर ‘जेलर’ची ॲडव्हान्स बुकिंग 2 लाख 30 हजार इतकी झाली आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही या चित्रपटाची प्रचंड क्रेझ पहायला मिळतेय. चित्रपट व्यापार विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जेलर’ने अमेरिकेत ॲडव्हान्स बुकिंगद्वारे आतापर्यंत जवळपास 53 लाख रुपये कमावले आहेत.

रजनीकांत यांच्या चित्रपटांविषयी असलेली क्रेझ तसूभरही कमी झाली नाही, हे ‘जेलर’च्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालं. कारण हा चित्रपट पाहण्यासाठी बेंगळुरू आणि चेन्नईमधील अनेक ऑफिसमध्ये प्रदर्शनाच्या दिवशी म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केली आहे. काही ठिकाणी तर ऑफिसमध्ये चित्रपटाची तिकिटं मोफत देण्यात आली आहेत.