
चित्रपटप्रेमींसाठी हा आठवडा खूपच खास आहे. कारण एकीकडे ‘वॉर 2’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय. तर दुसरीकडे रजनीकांत यांचा बहुचर्चित ‘कुली’ हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यामध्ये रजनीकांत यांच्यासोबतच नागार्जुन, सत्यराज, श्रुती हासन, पूजा हेगडे, आमिर खान आणि कन्नड अभिनेता उपेंद्र अशी मोठी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा बजेटसुद्धा थक्क करणारं आणि त्यातील कलाकारांना मिळालेलं मानधनसुद्धा अवाक् करणारंच आहे. या चित्रपटाला बनवण्यासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा वाहिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचा एकूण बजेट हा तब्बल 350 कोटी रुपये आहे. त्यापैकी ‘थलायवा’ रजनीकांत यांना सर्वाधिक मानधन मिळालं आहे. त्यांना मिळालेल्या मानधनाचा आकडा वाचून तुमचेही डोळे विस्फारतील!
‘कुली’ या चित्रपटात रजनीकांत हे देवाची भूमिका साकारणार आहेत, जो सोन्याची तस्करी करतो. या भूमिकेसाठी आधी त्यांचं मानधन 150 कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती. परंतु आता प्री-बुकिंगचा आकडा पाहून निर्मात्यांनी त्यांची फी अधिक वाढवली आहे. रजनीकांत यांना ‘कुली’साठी तब्बल 200 कोटी रुपये मिळणार आहेत. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. म्हणूनच त्याची प्री-बुकिंगसुद्धा चांगली झाली आहे. त्यातूनच चित्रपटाची बरीच कमाई होणार आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन लोकेश कनगराजने केलंय. सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याची प्रचंड लोकप्रियता आहे. त्यामुळे ‘कुली’साठी त्यांना तगडं मानधन मिळालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकेश कनगराज यांना 50 कोटी रुपये फी देण्यात आली आहे. लोकेशला ‘मास्टर’, ‘विक्रम’ आणि ‘लियो’ यांसारख्या गाजलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांसाठी ओळखलं जातं. अभिनेता आमिर खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. छोट्याशा भूमिकेसाठीही त्याला चांगली फी मिळाली आहे. आमिरने यामध्ये एका गँगस्टरची भूमिका साकारली आहे. फक्त 15 मिनिटांच्या भूमिकेसाठी त्याला 20 कोटी रुपये मिळाले आहेत.
या चित्रपटात तेलुगू सुपरस्टार नागार्जुन यांचीही भूमिका आहे. त्यांनी यामध्ये सायमनची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्यांना 10 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. तर संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंद्र यांना 15 कोटी रुपये मिळाले आहेत. ‘जेलर’ या गाजलेल्या चित्रपटानंतर अनिरुद्ध पुन्हा एकदा रजनीकांत यांच्यासोबत काम करत आहेत. ‘बाहुबली’मध्ये कटप्पाची भूमिका साकारलेले अभिनेते सत्यराज यांना ‘कुली’साठी पाच कोटी रुपये मानधन मिळालं आहे. तर उपेंद्रला ‘कलीशा’च्या भूमिकेसाठी जवळपास चार कोटी रुपये मिळाले आहेत. अभिनेत्री श्रुती हासनचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यासाठी तिनेही चार कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे. या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे फक्त एका गाण्यापुरती झळकली आहे. त्यासाठी तिला एक कोटी रुपये फी मिळाली आहे.