शिक्षा भोगून जेलबाहेर येताच राजपाल यादव म्हणतो…

शिक्षा भोगून जेलबाहेर येताच राजपाल यादव म्हणतो...

मुंबई : कर्ज न फेडल्याप्रकरणी तुरुंगवास भोगून परतलेला बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव हा पुन्हा सिनेमांमध्ये परतणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस त्याची शिक्षा पूर्ण होऊन तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर जवळपास एका महिन्यानंतर राजपाल यादव हा माध्यमांसमोर आला. लोकांनी माझ्या विश्वासाचा चुकीचा फायदा घेतला, अशी प्रतिक्रिया राजपाल यादवने दिली. मात्र, “आता मी त्या परिस्थितीतून सावरलो आहे आणि मी लवकरच सिनेमांमध्ये परतणार आहे”, असं त्याने सांगितलं.

“मी काही लोकांवर विश्वास केला, त्यांनी माझ्या विश्वासाचा फायदा घेतला. पण, आता मला याबाबत काहीही बोलायची इच्छा नाही. मला आता पुढे जायचं आहे, कारण मला आयुष्यात पुढे खूप काही मिळणार आहे”, असे राजपालने आयएएनएस वृत्तसंस्थेला सांगितलं.

“कायदा सर्वांसाठी सारखा आहे, देशाच्या कायद्यापासून कुणीही वाचू शकत नाही. त्यामुळे मी न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं. तुरुंगात राहणं अत्यंत कठीण होतं. तिथल्या नियमांचं आम्हाला कटाक्षाने पालन करावं लागायचं. मी सोबतच्या कैद्यांशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो. मी तिथे भाषणंही केली. सकाळी व्यायामही करत होतो. तिथे ग्रंथालय होतं, जिथे जाऊन मी वाचन करत होतो”, असे तुरुंगातील अनुभव राजपालने सांगितलं.

राजपाल हा लवकरच ‘टाईम टू डान्स’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं शूटिंग काहीच दिवसांत सुरु होणार आहे. त्यासोबतच तो ‘जाको राखे साइयां’ या सिनेमातही दिसणार आहे. तसेच दिग्दर्शक डेविड धवन यांच्यासोबत एका सिनेमाबाबत चर्चा सुरु असल्याचंही त्याने सांगितलं.

नवी दिल्लीच्या उच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2018 ला राजपाल यादवला तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. राजपाल यादवने एका कंपनीकडून घेतलेलं कर्ज न फेडल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली होती. राजपाल यादवने 2010 ला सिनेमाच्या निर्मितीसाठी पाच कोटीचं कर्ज घेतलं होतं.

Published On - 6:39 pm, Wed, 27 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI