ज्या चित्रपटामुळे राजपाल यादव तुरुंगात पोहोचला, त्याने किती कमावले? बजेट किती?

'अता पता लापता' हा चित्रपट अभिनेता राजपाल यादवच्या करिअरमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटाच्या अपयशामुळेच त्याला खूप मोठा आर्थिक फटका बसला असून तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागलं.

ज्या चित्रपटामुळे राजपाल यादव तुरुंगात पोहोचला, त्याने किती कमावले? बजेट किती?
Rajpal Yadav
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 11, 2026 | 2:05 PM

अभिनेता राजपाल यादवचं नुसतं नाव जरी घेतलं तरी चेहऱ्यावर हसू फुलतं. छोट्यातल्या छोट्या भूमिकांमध्येही जिवंतपणा आणणाऱ्या राजपाने ‘हेरा फेरी’, ‘भागम भाग’, ‘भुलभुलैया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तो हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतोय. परंतु सध्या राजपाल त्याच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाचा सामना करतोय. राजपालने त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच चित्रपट दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला आणि या प्रक्रियेदरम्यान केलेल्या चुकांमुळे तो खूप अडचणीत सापडला आहे. ही समस्या इतकी मोठी झाली की अखेर त्याला तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागलं.

दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणं आणि ‘अता पता लापता’ या चित्रपटाची कमान सांभाळणं हा राजपाल यादवच्या आयुष्यातील सर्वांत वाईट निर्णय ठरला. हा चित्रपट त्याच्यासाठी फक्त एक प्रोजेक्ट नव्हता तर त्याने त्याकडे स्वप्न म्हणून पाहिलं होतं. हे स्वप्न त्याने सत्यात उतरवलं आणि तो चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शितसुद्धा झाला. परंतु प्रेक्षकांकडून त्याला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटलेल्या या चित्रपटामुळे राजपालवर कर्जाचं डोंगर उभं राहिलं. कर्ज फेडण्यासाठी त्याने जे चेक्स दिले, ते सर्व बाऊन्स झाले. अखेर त्याच्याविरोधात हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. हा खटला बराच काळ चालला आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागलं. पडद्यावर विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांना हसवणारा हा अभिनेता तुरुंगात आत्मसमर्पण करताना स्वत: रडला.

राजपाल यादवने ज्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं, त्यात त्याने मुख्य भूमिकासुद्धा साकारली होती. या चित्रपटाचं बजेट जवळपास 11 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. 11 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 38 लाख रुपये कमावले होते. हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. फिल्म इंडस्ट्रीत अनेकांकडून उत्साहाच्या आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर काही निर्णय घेतले जातात. चित्रपट निर्मितीची आवड असणं ही चांगली गोष्ट असली तरी कधीकधी अनुभव आणि योग्य सल्ल्याचा अभाव महागात पडू शकतो, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक अनीस बाज्मीने दिली. बहुतेक कलाकारांना कागदपत्रे आणि करारांची गुंतागुंत नीट समजत नाही आणि इथूनच खऱ्या समस्येची सुरुवात होते.