Rajpal Yadav: ना VIP लाइन, ना खास एण्ट्री! लालबागचा राजाच्या दर्शनासाठी राजपाल यादव सर्वसामान्य भक्तांच्या रांगेत

Rajpal Yadat at Lalbaughcha Raja: अभिनेता राजपाल यादव नुकताच 'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठी पोहोचला. यावेळी त्याने व्हिआयपी दर्शन न घेता सर्वसामान्यांच्या रांगेतून बाप्पाचं दर्शन घेतलं. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Rajpal Yadav: ना VIP लाइन, ना खास एण्ट्री! लालबागचा राजाच्या दर्शनासाठी राजपाल यादव सर्वसामान्य भक्तांच्या रांगेत
राजपाल यादव
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 23, 2026 | 2:31 PM

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक गर्दी करतात. यंदाच्या गणेशोत्सवातही बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी बाप्पाच्या चरणी हजेरी लावली. मात्र अभिनेता राजपाल यादव याच्या दर्शनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे. राजपाल यादव इतर सेलिब्रिटींप्रमाणे वेगळी एण्ट्री न घेता भाविकांच्या रांगेत उभा राहिल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. लालबागच्या राजाच्या मंडपात पोहोचलेल्या राजपाल यादवने चक्क सामान्य भाविकांसोबत रांगेत उभं राहून दर्शनाची वाट पाहिली. यावेळी तो ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करताना दिसला. गर्दीत काही चाहत्यांनी त्याला ओळखलं आणि त्याच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली. राजपालनेही चाहत्यांना निराश न करता त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्याने बाप्पाचं दर्शन घेतलं.

राजपाल यादवचा हा साधेपणा पाहून सोशल मीडियावर अनेकांनी त्याचं कौतुक केलं. काही युजर्सनी त्याला ‘रिअल हिरो’ म्हटलं, तर काहींनी ‘VIP असावं तर राजपाल यादवसारखं’ अशा प्रतिक्रिया दिल्या. पैशांपेक्षा भक्ती महत्त्वाची असल्याचं सांगणाऱ्या प्रतिक्रियाही व्हिडीओखाली पाहायला मिळत आहेत. मात्र, राजपाल यादवच्या दर्शनाच्या व्हिडीओवरून सोशल मीडियावर दुसरी बाजूही समोर आली आहे. काही युजर्सनी तो सामान्य भाविकांच्या रांगेत नसून VIP दर्शनाच्या रांगेत असल्याचा दावा केला आहे. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये राजपालने काही काळ कॅमेऱ्यांसमोर रांगेत उभं राहिलं आणि नंतर त्याला विशेष दर्शन मिळाल्याचा दावा करण्यात आला.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी

लालबागचा राजा हा मुंबईतील सर्वाधिक लोकप्रिय गणपतींपैकी एक आहे. यंदा 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थीपासून दर्शनाला सुरुवात झाली असून अनंत चतुर्दशीपर्यंत उत्सव सुरू राहणार आहे. मंडपात मुखदर्शन आणि चरणस्पर्श दर्शनासाठी स्वतंत्र रांगा आहेत. यंदा शाहरुख खान, रणवीर सिंह, संजय दत्त, गोविंदा, परिणीती चोप्रा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. अशा परिस्थितीत राजपाल यादवचा साधेपणाने दर्शन घेण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.

राजपाल यादवच्या कायदेशीर प्रकरणाचीही चर्चा

दरम्यान, राजपाल यादव सध्या सुमारे 9 कोटी रुपयांच्या कर्जाशी संबंधित चेक बाऊन्स प्रकरणामुळे चर्चेत आहे. हे प्रकरण त्याच्या ‘अता पता लापता’ या चित्रपटासाठी घेतलेल्या कर्जाशी संबंधित आहे. सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याला थकीत रकमेबाबत आणखी मुदत दिली असून पुढील सुनावणी 5 ऑक्टोबरला होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us