‘धुरंधर’ची स्क्रिप्ट पंतप्रधानांच्या ऑफिसमधून आली? ‘जमील जमाली’ने दिलं सडेतोड उत्तर
'धुरंधर'मधील जमील जमालीच्या भूमिकेमुळे राकेश बेदी प्रचंड लोकप्रिय झाले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते या चित्रपटाबद्दल आणि त्याच्या पटकथेबद्दल लोकांना कसे प्रश्न पडले, यावर भाष्य केलं.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यापैकीच एक भूमिका म्हणजे जमील जमाली. ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांनी ही भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली आणि आजही त्या भूमिकेच्या डायलॉग्सचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राकेश बेदी यांनी ‘धुरंधर’च्या स्क्रिप्टवर होणाऱ्या आरोपांवर मनमोकळी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे दिग्दर्शक आदित्य धरने त्यांना चित्रपटातील सस्पेन्स आधीच सांगितला होता का, याचाही खुलासा त्यांनी केला.
‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत आदित्य धरसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल बोलताना राकेश यांनी सांगितलं, “मला त्याबद्दल माहीत होतं. पण जेव्हा मला कथा ऐकवण्यात आली होती, तेव्हा आदित्यने मला एक ओळ सांगितली. त्यानंतर त्याने मला बाऊंड स्क्रिप्ट पाठवली. जेव्हा मी ती स्क्रिप्ट दोन ते तीन वेळा वाचली, तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा एक खूप तणावपूर्ण चित्रपट आहे. केवळ तणावपूर्णच नाही तर दृश्यांच्या आणि डायलॉग्सच्या बाबतीत तीव्रसुद्धा आहे. मग मी विचार केला की एक अभिनेता म्हणून मी जास्त विनोदी भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे मी आदित्यला म्हणालो की मला अशा काही सीन्स दिसत आहेत, जिथे आपण थोडा विनोद समाविष्ट करू शकतो. मी थोडा प्रयत्न करून पाहू का? त्यावर तो म्हणाला, राकेशजी, आताच त्याबद्दल सांगणं कठीण आहे. पण बघूया काय होतंय पुढे.”
सुरुवातीला आदित्य विनोदी संवादांसाठी तयार नव्हता. पण नंतर शूटिंगदरम्यान त्यालाही मजा येऊ लागली आणि राकेश बेदींनाही मजा येऊ लागली. अशा पद्धतीने जमील जमालीची भूमिका अधिक रंगतदार बनली. राकेश बेदी पुढे म्हणाले की, जेव्हा चित्रपट हिट झाला, तेव्हा लोक म्हणाले की ‘धुरंधर’ची पटकथा पंतप्रधानांच्या कार्यालयातून आली होती. असं ऐकल्यावर मी त्यांना विचारतो की, “मला सांगा, पंतप्रधानांच्या कार्यालयात कोण असे डायलॉग लिहिणार? अशी गोष्ट कोणी कल्पनासुद्धा करू शकत नाही.”
‘धुरंधर’चा पहिला भाग 2025 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर यावर्षी मार्चमध्ये ‘धुरंधर : द रिव्हेंज’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर प्रचंड प्रतिसाद मिळाला. इतकंच नव्हे तर ‘धुरंधर 2’ हा चित्रपट सध्या भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.