UBT MPS Spilt : खासदार फोडल्यामुळे ऐन मतदानाच्या दिवशी नाशिकच्या राजकारणात टि्वस्ट, शिंदेंचा उमेदवार आला टेन्शनमध्ये
UBT MPS Spilt : मतदानाआधीच स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते माध्यमांशी न बोलता घरातून बाहेर पडले. विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. आज मतदानाच्या दिवशी गोकुळ गीते यांच्या घरी शुकशुकाट आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवला होता.

हाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी मतदान सुरु झालं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून हे विधान परिषद सदस्य निवडले जाणार आहेत. बहुतांश ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होत असतानाच महाराष्ट्रात अजून एक राजकीय घडामोड घडत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा फूट पडली आहे. दोन वर्षांपूर्वी निवडून आलेल्या 9 खासदारांपैकी 6 खासदार फुटल्याची चर्चा आहे. हा उद्धव ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. बंडखोर खासदार अजून समोर आलेले नाहीत. आज नेमकं चित्र स्पष्ट होईल. पण लोकसभेत ठाकरे गटात झालेल्या या फाटाफुटीचे पडसाद महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे 45 सदस्य अपक्ष उमेदवार गोकुळ गितेंना मतदान करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोकुळ गीते हे नाशिकमधून विधान परिषद निवडणूक लढवत आहेत. त्यांना भाजपकडून उमेदवारी हवी होती. पण ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेल्याने त्यांनी अपक्ष म्हणून उमेवादी दाखल केली. त्यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून बरेच प्रयत्न झाले. अखेर मनधरणीनंतर त्यांनी प्रचार थांबवला. पण उद्धव ठाकरे खासदारांच्या फाटाफुटीमुळे नाराज आहेत. त्यांच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी गोकुळे गीतेंना मतदान करतील असं दिसत आहे.
किती मते खेचू शकतो हे दाखवण्यासाठी मोर्चेबांधणी
सहा खासदार फोडल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची ही रणनीती आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीत ऐन मतदानाच्या दिवशी नवं राजकीय समीकरण तयार झालं आहे. प्रचार थांबवला असला तरी गोकुळ गीते पडद्यामागून सक्रिय असल्याची चर्चा आहे. किती मते खेचू शकतो हे दाखवण्यासाठी गितेंची मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे 16 मतदार तटस्थ राहणार आहेत. घोडेबाजार रोखण्यासाठी तटस्थ राहण्याचा काँग्रेसने निर्णय घेतला आहे. नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर मानला जात असतानाच गितेंच्या मतांबाबत उत्सुकता आहे. आज मतदार कुणाला कौल देणार यासंदर्भात देखील नाशिक मध्ये चर्चांना उधाण आलं आहे.
