
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. सोशल मीडियावरही याच चित्रपटाची चर्चा आहे. अवघ्या आठ दिवसांत हा चित्रपट 2025 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. केवळ वीकेंडच नाही तर मधल्या वारीही थिएटरमध्ये ‘धुरंधर’चे शोज हाऊसफुल आहेत. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराचं आणि विशेषकरून दिग्दर्शकाचं कौतुक होत आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेते राकेश बेदी यांनी आदित्य धरबद्दलचा खास किस्सा सांगितला आहे.
‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात राकेश बेदी फक्त एका सीनपुरतेच झळकले होते. या चित्रपटाच्या वेळी आदित्यने त्यांना एक आश्वासन दिलं होतं. पुढच्या चित्रपटात मी तुम्हाला खूप चांगली, ताकदीची भूमिका देणार, असं त्याने राकेश बेदी यांना सांगितलं होतं. त्यावेळी त्यांना हे सत्यात उतरेल याची कल्पना नव्हती. परंतु ‘धुरंधर’मधल्या जमील जमाली या पाकिस्तानी राजकारण्याची भूमिका त्याने खास राकेश बेदी यांच्यासाठी ठेवली होती. “आदित्य खूप वेगळा आहे. तो जे म्हणतो, ते खरं असतं. तो नितीमूल्यांना, संस्कारांना आणि आपल्या तत्त्वांना जपणारा, त्यांच्याशी एकनिष्ठ राहणार आहे. त्याचं व्यक्तिमत्त्व उथळ नाही”, अशा शब्दांत राकेश बेदींनी त्याचं कौतुक केलं.
याविषयी ते पुढे म्हणाले, “धुरंधर इतका हिट ठरतोय आणि ही तर फक्त सुरुवातच आहे. हा तर अर्धाच चित्रपट आहे, अजून अर्धा बाकी आहे. इतक्यातच आदित्य प्रकाशझोतात आला आहे. तो कोणालाच मुलाखती देत नाहीये, बोलत नाहीये. तो त्याच्या घरी जाऊन बसला आहे. तो फक्त त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय. मी हे केलं, मी ते केलं.. अशा बढाया तो मारत नाही. आपल्याच यशाचं कौतुक आपणच करावं.. अशातला तो नाही.”
‘धुरंधर’ हा स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपट दोन भागांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग मार्च 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मल्टिस्टारर चित्रपट असूनही प्रत्येक भूमिकेला यात समान न्याय मिळाला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात तब्बल 372.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.