आधी बंदी अन् आता…; या देशात ‘धुरंधर’च्या अख्ख्या टीमलाच कोर्टात खेचण्याची तयारी
'धुरंधर' हा चित्रपट पाकिस्तानविरोधी असल्याचं म्हणत काही आखाती देशांनी त्यावर बंदी आणली. त्यानंतर आता एका देशात थेट धुरंधरच्या संपूर्ण टीमला कोर्टात खेचण्याची तयारी केली जात आहे. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमविरोधात याचिका दाखल झाली आहे.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाविरुद्ध पाकिस्तानातील कराची न्यायालयात शुक्रवारी 12 डिसेंबर 2025 रोजी याचिका दाखल करण्यात आली. या चित्रपटात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा फोटो, पाकिस्तान पीपल्स पार्टीचा (PPP) ध्वज आणि पक्षाच्या रॅलींचे फुटेज परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे वापरल्यात आल्याच आरोप या याचिकेत केला आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटात पीपीपीला दहशतवादाला पाठिंबा देणारा पक्ष म्हणून दाखवल्याचा आरोपही आहे.पीपीपीचे कार्यकर्ते मोहम्मद अमीर यांनी कराची इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. ‘धुरंधर’चा दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि चित्रपटाच्या प्रमोशन, निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या सर्वांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली.
कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत अभिनेता रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन, राकेश बेदी, दिग्दर्शक आदित्य धर, निर्माते लोकेश धर आणि ज्योती किशोर देशपांडे यांची नावं आहेत. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बेनझीर भुट्टो यांचे फोटो आणि पीपीपीशी संबंधित दृश्ये कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय दाखवण्यात आली आहेत. चित्रपटात पीपीपीला दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती असलेला पक्ष म्हणून दाखवल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.
‘धुरंधर चित्रपटात कराचीतील ल्यारी परिसराचं वर्णन दहशतवाद्यांसाठी युद्धक्षेत्र असल्याचं केलंय. हे अत्यंत बदनामीकारक, दिशाभूल करणारं आणि पाकिस्तानच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणार आहे’, असं याचिकाकर्त्याने म्हटलंय. हा चित्रपट पीपीपी, त्यांचे नेते आणि समर्थक यांच्याविरुद्ध द्वेष आणि अपमान पसरवल्याचंही मोहम्मद अमीर पुढे म्हणाले. याचिकेत त्यांनी पाकिस्तान दंड संहितेच्या कलम 499, 500, 502, 504, 505, 153-अ आणि 109 चा उल्लेख केला आहे. हे कलम बदनामी, दंगली भडकावणे आणि वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे यांच्याशी संबंधित आहेत.
याआधी मध्य पूर्वेतील अनेक देशांमध्ये ‘धुरंधर’ या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. बहरीन, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिय आणि युएईमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला. या देशांमध्ये हा चित्रपट पाकिस्तानविरोधी असल्याचं मानलं जात आहे. आखाती देशांमधील सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी या चित्रपटाच्या आशयाला मान्यता दिली नाही.
