‘धुरंधर’मधल्या कसाबची का होतेय इतकी चर्चा? कोण आहे तो अभिनेता?
'धुरंधर' या चित्रपटात अजमल कसाबची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. दिसण्यातील साधर्म्य आणि दमदार अभिनय पाहून नेटकऱ्यांच्याही अंगावर काटा आला आहे. हा अभिनेता कोण, ते जाणून घ्या..

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटात रणवीर सिंहसोबतच अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी, सारा अर्जुन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. अगदी खलनायकी भूमिका असली तरी पडद्यावरील कलाकाराचं दमदार अभिनय पाहून प्रेक्षक-समिक्षक भारावून गेले आहेत. ‘धुरंधर’मध्ये अशा अनेक भूमिका आहेत, जे फक्त काही क्षणांसाठी स्क्रीनवर झळकले. परंतु त्या छोट्या सीनमध्येही त्यांनी जबरदस्त अभिनय केला आहे. अजमल कसाब.. हे नाव जरी म्हटलं जरी भारतीयांचं रक्त खवळतं. परंतु त्याच कसाबची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
कोण आहे दलविंदर सैनी?
‘धुरंधर’मध्ये दाखवलेल्या विविध भूमिकांची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. यादरम्यान या व्यक्तीचेही फोटो समोर आले, ज्याने चित्रपटात कसाबची भूमिका साकारली आहे. 26/11 मुंबई हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या अजमल कसाबची भूमिका अभिनेता दलविंदर सैनीने साकारली आहे. या चित्रपटात दलविंदची भूमिका तशी छोटीच होती. परंतु त्यातही त्याने ज्या कौशल्याने ती भूमिका साकारली आहे, त्याचं विशेष कौतुक होत आहे. दलविंदचं अभिनय पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
View this post on Instagram
दलविंदर हा मूळचा छत्तीसगडमधील दुर्ग इथला आहे. याआधी त्याने सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूरच्या ‘परम सुंदरी’ या चित्रपटात खूप छोटी भूमिका साकारली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दलविंदरचा जन्म मध्य प्रदेशातील सतनामध्ये झाला. कॉलेजमध्ये शिकतानाच त्याच्यात रंगभूमीवर काम करण्याची आवड निर्माण झाली. नंतर त्याने IPTA भिलाईमध्येही प्रवेश घेतला. त्यानंतर तो मुंबईत आला आणि इथल्या रंगशिला थिएटर ग्रुपचा भाग बनला.
‘धुरंधर’ हा मल्टीस्टारर चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. प्रेक्षक आणि समिक्षकांकडून या चित्रपटाचं कौतुक होत आहे. इतकंच नव्हे तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या चित्रपटाची आणि त्यातील कलाकारांच्या अभिनयाची प्रशंसा केली. गेल्या तीन दिवसांत या चित्रपटाने जगभरात कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकीकडे बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई होत असतानाच आता ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत झालेल्या डीलमधूनही या चित्रपटाने रग्गड पैसा कमावला आहे. निर्मात्यांनी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत करार केला आहे.
