Dhurandhar: ‘धुरंधर’ने OTT डीलमधून छापले तब्बल इतके कोटी रुपये
'धुरंधर' या चित्रपटाने नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मला डिजिटल हक्क विकले आहेत. ही डील कोट्यवधी रुपयांमध्ये झाल्याचं कळतंय. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून खूप कौतुक होत आहे.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा मल्टीस्टारर चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. प्रेक्षक आणि समिक्षकांकडून या चित्रपटाचं कौतुक होत आहे. इतकंच नव्हे तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या चित्रपटाची आणि त्यातील कलाकारांच्या अभिनयाची प्रशंसा केली. गेल्या तीन दिवसांत या चित्रपटाने जगभरात कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकीकडे बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई होत असतानाच आता ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत झालेल्या डीलमधूनही या चित्रपटाने रग्गड पैसा कमावला आहे. निर्मात्यांनी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत करार केला आहे. नेटफ्लिक्सला ‘धुरंधर’चे डिजिटल हक्क विकण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘धुरंधर’चे ओटीटी हक्क तब्बल 130 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. ‘धुरंधर’चा दुसरा भागसुद्धा नवीन वर्षातील मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही भागांचे हक्क नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत. ‘धुरंधर पार्ट 1’साठी 65 आणि ‘धुरंधर पार्ट 2’साठी 65 कोटी रुपये नेटफ्लिक्सने मोजले आहेत. त्यामुळे ‘धुरंधर’ने रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’, शाहरुख खानच्या ‘जवान’ आणि सलमान खानच्या ‘टायगर 3’ या चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, सारा अर्जुन, राकेश बेदी, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि आर. माधवन यांच्या भूमिका आहेत.
View this post on Instagram
आयएमडीबीने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखच्या ‘जवान’चे डिजिटल हक्क 120 कोटी रुपयांना नेटफ्लिक्सला विकण्यात आले होते. तर रणबीरचा ‘अॅनिमल’सुद्धा याच किंमतीला विकला गेला होता. सलमानच्या ‘टायगर 3’चे ओटीटी हक्क 95 कोटी रुपयांना विकले गेले होते.
धुरंधर हा चित्रपट वास्तविक कथेवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये अर्जुन रामपाल हा मेजर इक्बाल नावाच्या एका आयएसआय एजंटच्या भूमिकेत आहे. त्याच्या भूमिकेची ओळखच ट्रेलरमध्ये अत्यंत हिंसक पद्धतीने करून देण्यात आली आहे. तर आर. माधवनने अजय सन्यालची भूमिका साकारली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यापासून त्याची भूमिका प्रेरित आहे. अक्षय खन्ना यामध्ये रहमान डकाईच्या आणि संजय दत्त हा एसपी चौधरी अस्लमच्या भूमिकेत आहे.
