तासनतास ध्यानसाधना, वाचन, योगाभ्यास..; ‘रामायणा’तील प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेसाठी रणबीरने अशी केली तयारी
अभिनेता रणबीर कपूर 'रामायण' या चित्रपटात प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी त्याने कशी तयारी केली, याविषयीचा खुलासा खुद्द त्यानेच एका कार्यक्रमात केला आहे. यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तो योगाभ्यासदेखील करत आहे.

‘बर्फी’, ‘रॉकस्टार’, ‘अॅनिमल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये विविध छटा असलेल्या भूमिका साकारल्यानंतर आता अभिनेता रणबीर कपूर त्याच्या करिअरमधील सर्वांत वेगळ्आ भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटात तो प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी रणबीरने प्रचंड मेहनत केली आहे. जगभरातील अब्जावधी हिंदूंसाठी पूजनीय असलेल्या देवतेची भूमिका साकारणं हे सर्वांत मोठं आव्हान असल्याचं त्याने म्हटलंय. नुकत्याच एका कार्यक्रमात रणबीरने या भूमिकेसाठी कशा पद्धतीने तयारी केली, काय बदल केले याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे.
भूमिकेसाठी कशी केली तयारी?
शारीरिक बदलापेक्षा मानसिक आणि आध्यात्मिक प्रवास अधिक महत्त्वाचा असल्याचं रणबीरने यावेळी स्पष्ट केलं. तो म्हणाला, “मला नेहमी असं वाटतं की अशा प्रकारची तयारी ज्यात शरीरयष्टीवर काम करणं किंवा डान्स करणं हे सोपं असतं. कारण हे थोडं वरवरचं असतं. पण या वयात आणि आयुष्याच्या या टप्प्यावर हे पात्र साकारण्यासाठी प्रभू श्रीराम यांचं तत्त्वज्ञान खऱ्या अर्थाने खोलवर समजून घेणं खूप महत्त्वाचं होतं. कारण या भूमिकेतून मला सर्वोत्तम द्यायचं आहे आणि तेही अत्यंत साध्या पद्धतीने, कुठल्याही गुंतागुंतीशिवाय. या भूमिकेद्वारे मला अशी व्यक्ती बनायची होती, जिच्याशी 80 वर्षांची व्यक्तीसुद्धा स्वत:ला जोडू शकेल. वरवरच्या बदलापेक्षा प्रभू श्रीराम यांची शिकवण समजून घेणं अधिक महत्त्वाचं होतं.”
दोन वर्षांपासून योगाभ्यास
यावेळी रणबीरने सांगितलं की, त्याच्या या संपूर्ण तयारीच्या प्रवासात सखोल अभ्यास, विद्वानांचं मार्गदर्शन आणि अनेक वर्षांची आध्यात्मिक शिस्त यांची मुख्य भूमिका होती. “मी खूप वाचन केलं, अनेक विद्वानांना भेटलो. मी दोन वर्षे योगाभ्यास केला. सुवीर नावाचे माझे एक गुरू होते, जे मला प्रभू श्रीराम यांच्या शिकवणीच्या जवळ नेण्यासाठी माझ्यासोबत तासनतास बसून ध्यानसाधना करायचे. रामायण खऱ्या अर्थाने समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्याकडे त्याच्या अनेक आवृत्त्या आहेत”, अशा शब्दांत रणबीर व्यक्त झाला.
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा पहिला भाग यावर्षी नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत रणबीर कपूर, सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी आणि रावणाच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेता यश आहे. याशिवाय रवी दुबे, सनी देओल, रकुल प्रीत सिंह, लारा दत्ता, अरुण गोविल, विवेक ओबेरॉय आणि कुणाल कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.