Ramayan : राष्ट्रपती भवनात होणार ‘रामायण’चं स्क्रीनिंग ? कोण-कोण लावणार हजेरी ?
Ramayan : नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवस उरले आहेत. याच दरम्यान चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Ramayan : नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला बहुप्रतिक्षित, बहुचर्चित ‘ रामायण’ चित्रपटाचा पहिला भाग जगभरात रिलीजसाठी तयार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक मोठ्या उत्सुकेने बऱ्याच काळापासून वाट पहात आहेत. अखेर ती प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मात्र याच दरम्यान चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामायण चित्रपटाचं स्क्रीनिंग राष्ट्रपती भवनात देखील होणार आहे, आणि त्यावेळी काही खास पाहुणे देखील सहभागी होणार आहेत. रहो, हे खरं आहे, रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचं 5 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राजकीय नेत्यांसाठी खास स्क्रीनिंगचं आयोजन करण्याचं प्लानिंग सुरू आहे.
याच दिवशी हा चित्रपट सिनेमागृहात संपूर्ण जगात प्रदर्शित होणार आहे. या पौराणिक चित्रपटात रणबीर कपूर श्रीराम यांच्या आणि तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर साई पल्लवी ही सीतामाई, रवी दुबे हा लक्ष्मण आणि सनी देओल हनुमानची भूमिका साकारताना दिसणार आहे.
राष्ट्रपती भवनात दिसणार रामायण
मिड-डेच्या रिपोर्टनुसार, रामायण: पार्ट 1 हा चित्रपट येत्या 5 नोव्हेंबरला राष्ट्रपती भवनात राजकीय नेत्यांना दाखवण्याची योजना चालू आहे. चित्रपटाचे मेकर्स या खास स्क्रीनिंगसाठी आवश्यक परवानगी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप या कार्यक्रमाची अधिकृत पुष्टी झाली नाही. एका सूत्राने पोर्टललादिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या जागतिक प्रदर्शनाच्या दिवशीच राष्ट्रपती भवनात स्क्रीनिंगची योजना आखली जात आहे.
कोण होणार सहभागी ?
रिपोर्टनुसार, या खास स्क्रीनिंगसाठी रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवीसोबत चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारीही उपस्थित राहू शकतात. शिवाय,या पौराणिक चित्रपटाचे दोन प्रीमियर आयोजित करण्याचा मेकर्सचा प्लान आहे. त्यापैकी एक मुंबईत आणि दुसरे दिल्लीमध्ये होऊ शकतं. मुंबईतील प्रीमियरसाठी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) निवडण्यात आली असल्याची बातमी आहे. तरीही, दोन्ही स्क्रीनिंग आणि त्यात सामील होणाऱ्या स्टार्सबाबात अद्याप अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.
चित्रपटात दिसणार हे स्टार्स
रामायणमध्ये रणबीर कपूर, यश, साई पल्लवी, रवि दुबे आणि सनी देओल याच्या शिवाय रकुल प्रीत सिंग, लारा दत्ता, विवेक ओबेरॉय, शीबा चढ्ढा, अरुण गोविल आणि इंदिरा कृष्णनसह अनेक कलाकार दिसणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये याबद्दल उत्सुकता वाढली आहे. आता प्रेक्षक ही पौराणिक गोष्ट मोठ्या पडद्यावर पाहण्याची वाट पाहत आहेत.