Ramayana च्या शेवटी मोठा ट्विस्ट! सनी देओलच्या एन्ट्रीने चाहत्यांची उत्सुकता शिगेला
रणबीर कपूरच्या 'रामायण' मध्ये अनेक अभिनेते एकत्र दिसणार आहेत. पण चाहते ज्याची अतिशय उत्सुकतेने वाट पहात आहेत, ते म्हणजे सनी देओलची. त्याच्या भूमिकेबद्दल आणि अपिअरन्सबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

Ramayana : अभिनेता रणबीर कपूरच्या बहुप्रतीक्षि’त ‘रामायण’ चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटातील कलाकार, त्यांचे लूक आणि भव्य निर्मिती यामुळे या सिनेमाची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, लॉस एंजेलिसमधील ‘अकॅडमी म्युझियम ऑफ मोशन पिक्चर्स’च्या ‘डेव्हिड गेफेन थिएटर’मध्ये झालेल्या प्रीव्ह्यूचीही सध्या चर्चा होत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम यांच्या भूमिकेत, साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, आता सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे सनी देओल यांच्या संभाव्य एन्ट्रीचे वृत्त!
‘रामायण’च्या पहिल्या भागात दिसणार सनी देओल?
‘रामायण’च्या दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनाबाबत विविध चर्चा सुरू असतानाच, पहिल्या भागातील एका खास सीनबद्दल माहिती समोर आली आहे. लॉस एंजेलिसमधील स्क्रीनिंगनंतर एका चित्रपट समीक्षकाने सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केला. त्याच्या दाव्यानुसार, ‘रामायण: राइज ऑफ ए लिजंड’ या चित्रपटात पोस्ट-क्रेडिट सीन आहे. या सीनमध्ये चाहत्यांना ज्या खास पात्राची उत्सुकता आहे, त्याची झलक पाहायला मिळते. या समीक्षकाने आपल्या पोस्टमध्ये 2028 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या सिक्वेलबद्दलही उत्सुकता व्यक्त केली आहे. त्यामुळे या पोस्ट-क्रेडिट सीनमध्ये नेमके कोणतं पात्र दाखवण्यात आले आहे, याविषयी चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
भगवान हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल?
सनी देओल ‘रामायण’मध्ये भगवान हनुमानाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा यापूर्वीपासूनच सुरू होती. आता पोस्ट-क्रेडिट सीनमध्ये त्यांची झलक दिसल्याचा दावा केला जात असल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. चित्रपटाच्या शेवटी सनी देओलचं भव्य पद्धतीने पदार्पण दाखवण्यात आल्याचे काही वृत्तांमध्ये म्हटले जात आहे. सनी देओल यांची नेमकी भूमिका आणि त्यांचा स्क्रीनवरील वावर याबाबत अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.
2028 मध्ये येणार ‘रामायण’चा दुसरा भाग?
‘रामायण’चा पहिला भाग अजून रिलीजही झालेला नसतानाच आता पुढील, दुसऱ्या भागाबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. दुसऱ्या भागात कथा अधिक भव्य स्वरूपात सादर करण्यासाठी निर्माते चित्रपटाच्या प्रत्येक तपशिलावर काम करत असल्याची चर्चा आहे. पहिल्या भागातील पोस्ट-क्रेडिट सीनमधून पुढील भागाची झलक दाखवली जाणार असल्यास, हा सीन प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. आता सनी देओल यांची भगवान हनुमानाच्या भूमिकेतील झलक खरोखरच पहिल्या भागात पाहायला मिळणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
