केसांचं आरोग्य सुधारेल अन् मूडही होईल फ्रेश… काय आहे कोरियन हेड स्पा? जाणून घ्या त्याचे फायदे
Korean Head Spa: कोरियन स्किन केअर मुलींमध्ये आधीच एक ट्रेंड बनली आहे. कोरियन हेड स्पा देखील लोकप्रियता मिळवत आहेत. तुमच्या केसांसाठी फायदेशीर असण्याव्यतिरिक्त, ते तुम्हाला रिलॅक्स वाटण्यास आणि तुमचा मूड सुधारण्यास देखील मदत करू शकतात.

केसांची काळजी घेणे हा सेल्फ केअरचा एक अविभाज्य भाग आहे. आपण केसांना शॅम्पू लावतो, कंडिशनर लावतो आणि सीरम लावतो, पण आपण कधी आपल्या टाळूच्या आरोग्याकडे लक्ष देतो का? निरोगी टाळूमुळे आपले केस मुळापासून मजबूत होतात. पूर्वी टाळूला ओलावा देण्यासाठी तेलाने मालिश केली जात असे, पण आता फार कमी लोक ते करतात. आजकाल कोरियन हेड स्पा लोकप्रिय होत आहेत आणि तो एक अद्भुत अनुभव असू शकतो.
कोरियन हेड स्पा हे नेहमीच्या हेअर स्पापेक्षा खूपच वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण मानले जातात. हे केवळ केस मऊ करण्याच्या प्रोसेसपुरते मर्यादीत नाही, तर टाळूवरही काम करून केसांची मुळे निरोगी ठेवण्यास मदत करते. तसेच, हे सत्र खूप रिलॅक्स असून तणाव कमी करते, त्यामुळे तुमचा मूडही सुधारतो.
कोरियन हेड स्पाची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
टाळूचे एनालिसिस
कोरियन हेड स्पाला अद्वितीय बनवणारी पहिली गोष्ट म्हणजे टाळूचे सखोल एनालिसिस. यात ट्रीटमेंटच्या आधी मायक्रोस्कोपिक कॅमेऱ्याच्या साहाय्याने टाळूची बारकाईने तपासणी केली जाते. यामुळे त्वचेवरील बुरशी, कोंडा, घाण, उत्पादनांचा साचलेला थर आणि तेल यांचे अस्तित्व दिसून येते.
डीप डिटॉक्सिफिकेशन
दुसऱ्या प्रक्रियेत टाळू केवळ शॅम्पूने स्वच्छ करण्याऐवजी डीप क्लिन्झिंग केली जाते. यामध्ये टाळूचे स्केलिंग आणि एक्सफोलिएशन केले जाते. त्यानंतर क्लॅरिफाइंग प्रोडक्टच्या मदतीने टाळू स्वच्छ केला जातो. या प्रक्रियेमुळे टाळूवरील घाण तर निघून जातेच, शिवाय साचलेले खनिजांचे थर, प्रदूषणामुळे जमा झालेले धूलिकण, हेअर केअर प्रोडक्ट्सचे अवशेष आणि मृत त्वचेच्या पेशीही दूर होण्यास मदत होते.
मालिश केली जाते
या हेड स्पामध्ये विशिष्ट टप्प्यांनी टाळूची मालिश केली जाते, ज्यामुळे तुम्हाला अत्यंत रिलॅक्स वाटते. डोक्याची मालिश करण्यासाठी व्हायब्रेटिंग साधनांचाही वापर केला जातो, ज्यात मसाज बॉल रोलर्सचा समावेश असतो. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना पोषण मिळण्यास मदत होते. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत आरामदायी आहे. यामध्ये खांदे आणि मानेच्या मालिशचाही समावेश आहे, ज्यामुळे ताठरपणा आणि वेदना लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात.
लेटेस्ट टेक्निकचा वापर
कोरियन हेड स्पामध्ये एलईडी थेरपी आणि मायक्रो-मिस्ट स्टीमर्स यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. शिवाय, ते प्रामुख्याने नैसर्गिक हर्बल उत्पादने वापरतात, जी केसांसाठी कमी हानिकारक असतात.
