Ranveer Singh: माझे सिनेमे चालत नव्हते, तेव्हा अंबानी कुटुंबाने..; ‘धुरंधर’च्या यशानंतर रणवीर सिंह भावूक
Ranveer Singh: करिअरमधील कठीण काळ आणि धुरंधरचं यश याविषयी बोलताना अभिनेता रणवीर सिंह भावूक झाला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्याने अंबानी कुटुंबाचेही आभार मानले आहेत.

अभिनेता रणवीर सिंहच्या करिअरला ‘धुरंधर’ या चित्रपटाने मोठी कलाटणी दिली. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर रणवीरने त्याच्या करिअरमधील कठीण काळाची आठवण सांगत अंबानी कुटुंबाचे आभार मानले आहेत. काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करत नसतानाही अंबानी कुटुंब आणि जिओ स्टुडिओजने ‘धुरंधर’वर विश्वास दाखवला, असं रणवीरने सांगितलं. रिलायनच्या ‘पर्वा है तो परिवार है’ या डॉक्युमेंटरीमध्ये रणवीरने ‘धुरंधर’च्या प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं. त्याच्या मते हा चित्रपट बनवणं अजिबात सोपं नव्हतं. अनेक आव्हानं असतानाही निर्मात्यांनी पूर्ण विश्वासाने हा प्रोजेक्ट पुढे नेला. हा धोका यशस्वी ठरला तर भारतीय सिनेमात नवा इतिहास घडेल, असा विश्वास टीमला होता.
‘धुरंधर’ फ्रँचायझीला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर रणवीर सिंह भावूक झालेला पहायला मिळाला. मुंबईतील या कार्यक्रमादरम्यान चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल रणवीरने कृतज्ञता व्यक्त केली. त्याच्या या भावूक क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं आहे. आदित्य धर दिग्दर्शित या फ्रँचायझीमध्ये रणवीरने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. या यशामुळे रणवीरच्या स्टारडमलाही नवी उंची मिळाली.
पहा व्हिडीओ
“मला भरपूर प्रेम, पाठिंबा आणि प्रोत्साह मिळालं. अगदी त्यावेळीसुद्धा, जेव्हा माझे चित्रपट चांगली कामगिरी करत नव्हते. करिअरमध्ये चढउतार येतच असतात. पण अशा प्रकारचा पाठिंबा मिळणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हा पाठिंबा कोणत्याही आशीर्वादापेक्षा कमी नाही”, अशा शब्दांत रणवीर व्यक्त झाला. धुरंधर या चित्रपटात रणवीर सिंहसोबतच अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन, राकेश बेदी, गौरव गेरा आणि दानिश पंडोर यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.
रणवीरने सांगितलं, करिअरमध्ये चढउतार येत असतात. मात्र त्याच्या काही फिल्म्स चांगली कामगिरी करत नसतानाही त्याला अंबानी कुटुंबाकडून प्रेम, प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळत राहिला. त्यामुळे हा पाठिंबा त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. त्याने अंबानी कुटुंबासोबतचं नातं आशीर्वाद, सन्मान आणि विशेषाधिकार असल्याचं म्हटलंय. ‘धुरंधर’च्या दोन्ही भागांनी मिळून जगभरात 3000 कोटींहून अधिक कमाई केली.