3000 कोटींचा ‘धुरंधर’ Vs 45 कोटींचा ‘डॉन 3’; रणवीर-फरहानच्या या मोठ्या लढाईमागील सत्य काय?

'डॉन 3' या चित्रपटाचा वाद आता अशा एका टप्प्यावर पोहोचला आहे, जिथे अहंकार, पैसा आणि स्टारडम यांची टक्कर पहायला मिळतेय. या वादात फरहान अख्तर आणि रणवीर सिंह एकमेकांसमोर उभे आहेत.

3000 कोटींचा धुरंधर Vs 45 कोटींचा डॉन 3; रणवीर-फरहानच्या या मोठ्या लढाईमागील सत्य काय?
Farhan Akhtar and Ranveer Singh
Image Credit source: Instagram
| Updated on: May 27, 2026 | 11:03 AM

अभिनेता रणवीर सिंह आणि फरहान खान यांच्या ‘डॉन 3’ या चित्रपटावरून सुरू झालेला वाद ही केवळ दोन बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांमधील लढाई नाही तर ही चित्रपट निर्मितीचे करार, सुपरस्टार्सची वचनबद्धता आणि चित्रपट संघटनांची ताकद या सर्वांचा समावेश असलेला एक गुंतागुंतीचा मुद्दा आहे. एकीकडे फरहान आणि फेडरेशन हे नियम आणि करारांचा हवाला देऊन रणवीरला आपल्या ताकदीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे रणवीरकडे 3000 कोटी रुपयांचा ‘धुरंधर’ असल्याचं भक्कम कवच आहे. याआधी चित्रपटसृष्टीतील असे मोठे वाद बंद दाराआडच्या बैठका, आर्थिक तडजोडी आणि परस्पर संमतीने मिटवण्यात आल्या आहेत. आता धुरंधर रणवीर या पेचातून स्वत:ची सुटका कशी करून घेतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण वादामागील मुख्य कारणं आणि त्यातील कायदेशीर बाबी काय आहेत, ते सविस्तर जाणून घेऊयात..

FWICE च्या आदेशाचा नेमका अर्थ काय?

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वांत मोठी संघटना आहे. यामध्ये तंत्रज्ञ, ज्युनिअर आर्टिस्ट, स्पॉटबॉय, कॅमेरामन, सेट डिझायनर आणि एडिटर्स यांच्यासह जवळपास 4 ते 5 लाख कामगार आणि सदस्य आहेत. जेव्हा ही संघटना एखाद्या कलाकाराविरोधात ‘असहकार’ जाहीर करते, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की फेडरेशनचा कोणताही सदस्य त्या अभिनेत्याच्या प्रोजेक्टवर काम करणार नाही. तांत्रिकदृष्ट्या यामुळे रणवीरच्या आगामी प्रोजेक्ट्सवर मोठा परिणाम होऊ शकतो.

45 कोटी रुपयांचं नुकसान

‘डॉन 3’ची निर्मिती करणाऱ्या एक्सेल एंटरटेन्मेंटने दावा केला की, त्यांचा हा चित्रपट मोठा अॅक्शन प्रोजेक्ट आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय स्टंट डायरेक्टर्सना अनेक महिन्यांपासून आगाऊ पैसे देण्यात आले होते, सेट डिझाइन निश्चित करण्यात आलं होतं. देश आणि परदेशातील अनेक लोकेशन्स बुक करण्यात आली होती. अशातच जेव्हा मुख्य अभिनेता रणवीरने अचानक माघार घेतल्याने ही सर्व गुंतवणूक आणि महिन्याभराचं नियोजन यांवर एका क्षणांत पाणी फेरलं. तोवर या चित्रपटावर जवळपास 45 कोटी रुपये खर्च झाले होते. आता ही रक्कम रणवीरकडून मिळवण्याचा प्रयत्न निर्मात्यांकडून होत आहे.

‘धुरंधर’नंतर रणवीरची वाढलेली मागणी

बॉलिवूड इंडस्ट्री नेहमीच उगवत्या सूर्याला सलाम करते. रणवीरच्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ या दोन्ही चित्रपटांनी मिळून 3000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्यामुळे रणवीर सिंह हे नाव आता बॉलिवूडमध्ये सर्वांत महत्त्वाचं आणि मोठं बनलं आहे. जेव्हा एखादा अभिनेता इतक्या मोठ्या पातळीवर कमाई करून देऊ शकतो, तेव्हा मोठे स्टुडिओ आणि निर्मात्यांच्या संघटना अनेकदा युनियनच्या निर्णयांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी हस्तक्षेप करतात. कारण कोणताही मोठ्या स्टुडिओ रणवीरसोबत आपले चित्रपट रद्द करू इच्छिणार नाही.

वादाचा संपूर्ण घटनाक्रम

  • 2023-2024 च्या मध्यास– फरहान अख्तरने शाहरुख खानच्या जागी रणवीर सिंहला ‘डॉन 3’मध्ये घेण्याची घोषणा केली.
  • 2025-2026 च्या सुरुवातीला- रणवीरच्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आणली. या प्रचंड यशानंतर रणवीरचं बाजारमूल्य गगनाला भिडलं आणि त्याला अनेक मोठ्या ऑफर्स येऊ लागले.
  • मार्च-एप्रिल 2026– ‘धुरंधर’च्या यशानंतर रणवीर त्याच्या आगामी चित्रपटांच्या पटकथांबद्दल अधिक सावध झाला. फरहान अख्तरने लिहिलेल्या ‘डॉन 3’च्या अंतिम पटकथेवर आणि अॅक्शन सीक्वेन्सवर रणवीर पूर्णपणे समाधानी नव्हता, अशी चर्चा होती. त्यामुळे रणवीरने ‘डॉन 3’ सोडण्याचा निर्णय घेतला.
  • मे 2026 च्या सुरुवातीला– रणवीरने अचानक माघार घेतल्यानंतर फरहान अख्तरच्या प्रॉडक्शन हाऊस, एक्सेल एंटरटेन्मेंटने एक कठोर भूमिका घेतली. चित्रपटासाठी खर्च झालेले 45 कोटी रुपये रणवीरला परत करावे लागतील, अशी भूमिका त्यांनी घेतली.
  • सोमवार, 25 मे 2026– निर्मात्यांच्या तक्रारीची दखल घेऊन फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने सोमवारी रणवीरविरोधात असहकाराची अधिकृत नोटीस जारी केली. तेव्हा हा वाद शिगेला पोहोचला. फेडरेशनने आपल्या सर्व सदस्यांना रणवीरसोबत काम न करण्याचे निर्देश दिले.
Follow Us