विनाकारण लोकांना..; 370 रुपयांच्या बिर्याणीच्या वादात बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्याचा प्रणित मोरेला पाठिंबा

370 रुपयांच्या बिर्याणीच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉमेडियन प्रणित मोरेचा शो चर्चेत आला आहे. एकीकडे संपूर्ण देशभरातून त्याच्यावर टीका होत असताना एका बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्याने मात्र त्याला खुला पाठिंबा दर्शविला आहे.

विनाकारण लोकांना..; 370 रुपयांच्या बिर्याणीच्या वादात बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्याचा प्रणित मोरेला पाठिंबा
Pranit More And Himanshu Jangra
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 12, 2026 | 12:31 PM

कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये 370 रुपयांच्या बिर्याणीच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. 370 रुपयांच्या बिर्याणीच्या बदल्यात मुलीकडून वसुलीची भाषा करणाऱ्या हिमांशू जांग्रावर सर्वच स्तरातून तीव्र टीका होत आहे. अभिनेत्री रश्मी देसाई, इन्फ्लुएन्सर कुशा कपिला, आयेशा खान, रीम शेख यांसह इतरही अनेक कलाकार आणि इन्फ्लुएन्सर्सनी प्रणित आणि हिमांशूवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर थेट प्रणितच्या शोवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. एकीकडे देशभरातून प्रणित मोरे आणि त्याच्या शोमध्ये केल्या जाणाऱ्या अश्लील विनोदांना तीव्र विरोध केला जात असतानाच आता बॉलिवूडमधल्या एका अभिनेत्याने मात्र त्याची बाजू घेतली आहे. उलट प्रणित मोरेला ट्रोल करणाऱ्यांना या अभिनेत्याने सुनावलं आहे.

प्रणित मोरेच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेला हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून रणवीर शौरी आहे. रणवीरने त्याच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलं, ‘कॉमडीवरून इतका गोंधळ निर्माण करणं बंद करा भारत. ज्या समाजात कॉमेडी आणि कॉमेडियन्सचा अनादर केला जातो, तो समाज हळूहळू आत्मपरिक्षणाची क्षमता गमावून बसतो.’ रणवीरच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘अशा मूर्ख लोकांच्या कॉमेडीला कॉमेडी म्हणत नाही सर, जे चार्ली चॅप्लिन करायचे, ती कॉमेडी होती. ही लोकं फक्त सेक्सिएस्ट आणि सायकोसारखी आहेत’, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

रणवीर शौरीच्या प्रतिक्रिया-

नेटकऱ्यांच्या या टीकेला उत्तर देत रणवीरने पुढे लिहिलं, ‘तुम्ही त्या विनोदांवरच हसा, जे तुम्हाला आवडतात. जे तुम्हाला आवडत नाहीत, त्यावर हसू नका. यासाठी एखाद्यावर घोळका करून चढून त्याचं मॉब लिंचिंग करायची गरज नाही.’ रणवीरच्या मताशी असहमती दर्शवत नेटकऱ्यांनी आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. आजकालचे कॉमेडियन कॉमेडी करत नाहीत, अशी तक्रार त्यांनी बोलून दाखवली. त्यावर रणवीरने म्हटलंय, ‘कॉमेडी हे काही विज्ञान नाही. जेव्हा तुम्ही एखादा वाईट विनोद ऐकता किंवा वाचता, तेव्हा सरळ डोळे फिरवरून पुढे निघून जा. यात मॉब लिंचिंग करण्यासारखं काही नाही.”

प्रणित मोरेच्या शोमध्ये एका 23 वर्षीय तरुणाने महिलेबद्दल असभ्य टिप्पणी केली होती. मुलीसोबत 370 रुपयांची बिर्याणी खाल्ल्यानंतर ते पैसे तिच्याकडून शारीरिक संबंध ठेवून मिळवण्याविषयी त्याने अश्लील विनोद केला होता. हिमांशू जांग्रा नावाच्या या तरुणाला रोखण्याऐवजी प्रणित त्यावर हसू लागला होता. हा व्हिडीओ व्हायरल होताच देशभरातील लोकांमध्ये संतापाची लाट उसळली.

Follow Us