घटस्फोटाच्या 10 वर्षांनंतर रश्मी देसाई दुसऱ्या लग्नाच्या तयारीत? जोडीदाराबद्दल म्हणाली..
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. एका मुलाखतीत ती तिच्या दुसऱ्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. रश्मीने अभिनेता नंदिश संधूशी पहिलं लग्न केलं होतं.

रश्मी देसाई ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक हिट मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 2006 मध्ये तिने ‘रावण’मधून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘परी हूँ मै’, ‘उतरन’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रश्मी तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. लग्नाबद्दल बोलताना तिने सांगितलं की, तिला विश्वास आहे की योग्य वेळी योग्य व्यक्ती तिच्या आयुष्यात नक्की येईल. त्याचवेळी पालक तिच्यासाठी जोडीदार शोधत असल्याचंही तिने कबूल केलं. आतापर्यंतच्या करिअरमध्ये रश्मी देसाईचं नाव विविध स्टार्ससोबत जोडलं गेलं. परंतु त्यावर तिने कधीच कोणती प्रतिक्रिया दिली नव्हती.
रश्मीने 2011 मध्ये अभिनेता नंदीश संधूशी लग्न केलं. परंतु लग्नानंतर चार वर्षांनीच ते विभक्त झाले. आता पालक तिच्यासाठी दुसरा जोडीदार शोधत असल्याचा खुलासा रश्मीने या मुलाखतीत केला. “माझे पालक माझ्यासाठी जोडीदार शोधण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करत आहेत. पण खरं सांगायचं झालं तर, मला असा विश्वास आहे की योग्य वेळी माझ्या आयुष्यात योग्य व्यक्ती येईल”, असं ती म्हणाली. रश्मीने ‘बिग बॉस 15’मध्येही भाग घेतला होता. त्यावेळी तिचं नाव स्पर्धक अरहानशी जोडलं गेलं होतं. नंतर तिला समजलं की अरहानने तिची फसवणूक केली आहे. त्यानंतर त्यांचं नातं संपुष्टात आलं. बिग बॉसमधीलच आणखी एक स्पर्धक सिद्धार्थ शुक्लासोबतही रश्मीचं नाव जोडलं गेलं होतं. परंतु दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिपला नकार दिला होता. रश्मी आणि सिद्धार्थने ‘दिल से दिल तक’मध्येही एकत्र काम केलं होतं.
View this post on Instagram
मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकलेली रश्मीने खऱ्या आयुष्यात कठीण काळाचा सामना केला. भावनिक ताणामुळे मानसिक आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम झाल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं. “एक वेळ अशी होती, जेव्हा मी आठ वर्षे नैराश्याचा सामना करत होती. त्यातून बाहेर पडायला मला वेळ लागला. कारण माझ्यावर प्रचंड भावनिक ताण होता. सर्वकाही सुरळीत करण्यासाठी आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी मला काही वर्षांचा काळ लागला. आता पुन्हा एकदा मी हळूहळू रुळावर येत आहे”, असं ती म्हणाली.
