त्यासाठी मी घरी खूप भांडले..; विजयबद्दल रश्मिका मंदानाचा खुलासा

अभिनेत्री रश्मिका मंदानाने एका कार्यक्रमात विजयबद्दलचा हा किस्सा सांगितला होता. त्याच्यासोबत दुसऱ्यांदा काम करण्यासाठी तिला घरी खूप भांडावं लागलं होतं. याविषयी रश्मिका नेमकं काय म्हणाली, ते जाणून घ्या..

त्यासाठी मी घरी खूप भांडले..; विजयबद्दल रश्मिका मंदानाचा खुलासा
Vijay Deverakonda and Rashmika Mandanna
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 16, 2026 | 1:32 PM

अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोडा यांनी 26 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. रश्मिकाला व्यावसायिक आयुष्यात बरंच यश मिळालं असलं तरी खासगी आयुष्यात तिला बऱ्याच कॉन्ट्रोव्हर्सीचा सामना करावा लागला. लग्नाच्या काही दिवसांतच तिच्या आईची एक ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली. ज्यामध्ये त्या रश्मिका आणि अभिनेता रक्षित शेट्टीच्या मोडलेल्या साखरपुड्याविषयी बोलत होत्या. त्यानंतर आता रश्मिकाच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती विजय देवरकोंडाशी दुसऱ्यांदा चित्रपटात काम करण्यासाठी कुटुंबीयांशी कशा प्रकारे भांडावं लागलं, याचा खुलासा करत आहे.

2019 मध्ये रश्मिका आणि विजयचा ‘डिअर कॉम्रेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये रश्मिका म्हणाली होती, “मी माझ्या आईवडिलांशी, मित्रमैत्रिणींशी, कुटुंबीयांशी भांडून या फिल्म इंडस्ट्रीत आले. ही इंडस्ट्री मुलींसाठी सुरक्षित नाही, असा अनेकांचा विचार होता. फिल्मी बॅकग्राऊंड नसतानाही मी इथे टिकून राहिले. 2018 मध्ये विजयसोबत ‘गीता गोविंदम’ हा चित्रपट केल्यानंतर पुन्हा लगेचच त्याच्यासोबत दुसरा चित्रपट मी करू नये असं माझ्या कुटुंबीयांचं मत होतं. पण जेव्हा भरत सर माझ्याकडे स्क्रिप्ट घेऊन आले, तेव्हा मला तो चित्रपट खरंच करावासा वाटला. पण त्यासाठी मला माझ्या कुटुंबीयांची मनधरणी करावी लागली. त्या विषयावरून घरी मोठं भांडणसुद्धा झालं होतं. ते स्पष्ट म्हणाले की, विजयसोबत दुसरा चित्रपट करू नकोस. मी त्यांना समजावत होते की मी कोणासोबत हा चित्रपट करतेय, ते महत्त्वाचं नाही.” हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रश्मिका काही आठवड्यांपर्यंत ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. ऑनस्क्रीन विजयसोबत किसिंग सीन केल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं होतं.

विजय आणि रश्मिका यांनी ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. गीता गोविंदमच्या शूटिंगच्या वेळी या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं होतं. काही वर्षे डेट केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यांनी धूमधडाक्यात लग्न केलं. या दोघांनी लग्नापर्यंत त्यांचं रिलेशनशिप माध्यमांपासून लपवलं होतं.

Follow Us