साऊथ ते मराठी.. रवी प्रकाश यांची खाकी वर्दीत दमदार एण्ट्री; ‘दशमी’मध्ये साकारणार ही भूमिका
‘दशमी’च्या टीझरमधील रवी प्रकाश यांचा खाकी वर्दीतील अंदाज पाहता त्यांची व्यक्तिरेखा चित्रपटाच्या थरारक कथानकात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं स्पष्ट होतं. आता ‘साऊथ’मधील हा अभिनेता मराठी प्रेक्षकांच्या मनात किती ठसा उमटवतो, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समोर येईल.

मराठी चित्रपटसृष्टीत दाक्षिणात्य कलाकारांची एन्ट्री होण्याचा ट्रेंड आता अधिकच रंगताना दिसत आहे. मराठी कलाकार साऊथच्या सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण करत असतानाच दाक्षिणात्य कलाकारही मराठी चित्रपटांकडे वळताना दिसत आहेत. प्रसिद्ध तेलगू अभिनेता रवी प्रकाश आता आगामी ‘दशमी’ या मराठी चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत. विशेष म्हणजे, पहिल्याच मराठी चित्रपटात त्यांना साधी भूमिका न मिळता थेट एका डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. रवी प्रकाश ‘दशमी’मध्ये ACP आसिफ मुजावर ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. खाकी वर्दी, रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि पोलिसी अंदाज अशा लूकमध्ये त्यांची दमदार झलक चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पॉवरपॅक्ड टीझरमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे रवी प्रकाश यांच्या मराठी पदार्पणाची उत्सुकता आता चांगलीच वाढली आहे.
‘दशमी’ हा रहस्य, थरार आणि सामाजिक वास्तवाचा वेध घेणारा चित्रपट आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कथानकात तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका महत्त्वाची आहे. रवी प्रकाश यांनी साकारलेला ACP आसिफ मुजावर हा केवळ डॅशिंग अधिकारी नसून तपासातील बारकावे समजून घेणारा आणि सखोल माहिती असलेला निष्णात अधिकारी आहे. या भूमिकेसाठी रवी प्रकाश यांच्याकडून विशेष तयारी करून घेण्यात आली. पोलीस अधिकाऱ्याची देहबोली, बोलण्याची पद्धत आणि तपास करताना आवश्यक असलेला आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी त्यांच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहेत. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना रवी प्रकाश यांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
‘दशमी’मध्ये दिग्गज कलाकारांची फौज
‘दशमी’ चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केलं आहे. केएनके बॉक्स प्रस्तुत हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात रवी प्रकाश यांच्यासोबत महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, विजय निकम, गौरी इंगवले, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकवाड, शाम माशाळकर आणि राज कुंदन असे अनेक अनुभवी कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. मराठी चित्रपटातून पदार्पण करण्याबद्दल रवी प्रकाश यांनी आनंद व्यक्त केला. पहिल्याच मराठी चित्रपटात अशा प्रकारची भूमिका मिळणं आपल्यासाठी विशेष असल्याचं त्यांनी सांगितलं. ACP आसिफ मुजावर ही केवळ डॅशिंग व्यक्तिरेखा नसून तपासाची सखोल माहिती असलेला अधिकारी आहे, असं त्यांनी नमूद केलं.
