
आजकाल फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांचे घटस्फोट होताना दिसतात. नुकताच शास्त्रीय आणि नाट्यसंगीताचा वारसा पुढे नेणारे गायक राहुल देशपांडे यांचा देखील घटस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल यांनी पत्नी पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
काय आहे राहुल देशपांडेची पोस्ट?
राहुल देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी, तुमच्यापैकी प्रत्येकाने माझ्या प्रवासात आपापल्या परीने एक महत्त्वाचा भाग निभावला आहे आणि म्हणूनच मला तुमच्यासोबत एक वैयक्तिक आणि महत्त्वाचे अपडेट शेअर करायचे आहे. तुमच्यापैकी काही जणांना मी ही बातमी आधीच सांगितली आहे. 17 वर्षांच्या संसारानंतर आणि अनेक अविस्मरणीय आठवणींनंतर मी आणि नेहाने परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे कायदेशीर विलगीकरण सप्टेंबर 2024 मध्ये सौहार्दपूर्णरित्या पूर्ण झाले असे म्हटले.
वाचा: प्रियाचा अवघ्या 38व्या वर्षी मृत्यू, अगदी कमी वयात कर्करोग का होतो? काय आहेत लक्षणे?
पुढे ते म्हणाले की, मी हे अपडेट शेअर करण्यापूर्वी काही वेळ घेतला. जेणेकरून या बदलाच्या प्रक्रियेला मी खाजगीरित्या हाताळू शकेन आणि सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. विशेषतः आमची मुलगी रेणुका हिच्या हिताची. ती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे आणि मी नेहा सोबत तिच्यासाठी अतुट प्रेम, साथ आणि स्थैर्य देण्यास कटिबद्ध आहे. हा जरी आमच्या वैयक्तिक आयुष्यातील एक नवीन अध्याय असला, तरी पालक म्हणून आमचे नाते आणि एकमेकांबद्दलचा आदर आजही तितकाच घट्ट आहे. या काळात तुम्ही माझ्या गोपनीयतेचा आणि निर्णयाचा आदर कराल अशी आशा आहे.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
राहुल देशपांडे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. त्यांच्या या घटस्फोटाच्या निर्णयामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे. अनेकजण सोशल मीडियावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. मात्र, त्यांच्या घटस्फोटाचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही.