रिंकू राजगुरूच्या ‘जिजाई’ चित्रपटाची उत्सुकता; कपाळी चंद्रकोर अन्

अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या नव्या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला आहे. 'जिजाई' असं तिच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा झी स्टुडिओजसोबत काम करतेय.

रिंकू राजगुरूच्या जिजाई चित्रपटाची उत्सुकता; कपाळी चंद्रकोर अन्
Rinku Rajguru
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 02, 2024 | 8:06 AM

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातून देशभरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने नंतरही काही दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘झिम्मा 2’मधील तिच्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून विशेष कौतुक झालं होतं. त्यानंतर रिंकू कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. आता त्याचं उत्तर मिळालेलं आहे. झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याने ‘जिजाई’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. ‘जिजाई’ चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

‘सैराट’च्या यशानंतर रिंकू राजगुरू आणि झी स्टुडिओज यांच्यात एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. आता या जोडीने पुन्हा एकदा ‘जिजाई’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचा निर्धार केला आहे. हा नवीन चित्रपट लवकरच प्रकारांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. अपूर्वा शाळीग्राम या चित्रपटाच्या डीओपी आहेत.

रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ‘जिजाई’च्या मुहूर्त सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोवरून समजतंय की कपाळी चंद्रकोर लावलेली रिंकू या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे. झी स्टुडिओजचे बवेश जानवलेकर चित्रपटाविषयी म्हणाले, ‘’झी स्टुडिओज नेहमीच नवोदित कलाकारांना आणि दिग्दर्शकांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ असते. झी स्टुडिओजने प्रेक्षकांसाठी कायमच दर्जेदार आणि वेगळ्या आशयाचे चित्रपट सादर केले आहेत. ‘जिजाई’ हा त्याच परंपरेचा भाग आहे.’’

या चित्रपटात रिंकूसोबत इतक कोणत्या कलाकारांच्या भूमिका असतील, त्यात रिंकूची भूमिका नेमकी कशी असेल, चित्रपटाची कथा कशी असेल, याबद्दलची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र रिंकूच्या फोटोने चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे. नावावरून हा एक ऐतिहासिक चित्रपट असेल का, असाही प्रश्न नेटकऱ्यांच्या मनात उपस्थित झाला आहे.