
Kantara- Chapter 1: दसऱ्याच्या मुहूर्तावर कन्नड सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा : चाप्टर 1’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने प्रेक्षक-समीक्षकांची मनं जिंकली आहेत. अवघ्या आठवडाभरात या चित्रपटाने कमाईचा 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. माऊथ पब्लिसिटीचा या चित्रपटाला आणखी फायदा होणार आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’चा हा प्रीक्वेल आहे. यातील प्रत्येक सीन इतका दमदार आहे की प्रेक्षक त्याचं भरभरून कौतुक करत आहेत. फक्त सहा दिवसांत या चित्रपटाने आपला बजेट वसूल केला आहे. यामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या ऋषभ शेट्टीने आता त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात त्याने ‘कांतारा: चाप्टर 1’च्या यशामागचं कारण सांगितलं आहे.
“गेल्या भागापासून ते या भागापर्यंत आम्ही या चित्रपटाचा दृश्यात्मक रुपात विस्तार केला आहे. मी याआधीही म्हटलं होतं की, आपण जितके अधिक प्रादेशिक असू तितके आपण अधिक जागतिक बनू आणि नेमकं तेच घडलं. हा चित्रपट आणि ती भूमिका हे माझं स्वप्न होतं. माझ्या स्वप्नाला माझ्या टीमने डोक्यावर उचलून घेतलं आणि आता तेच जनतेचं स्वप्न बनलं आहे. माझी ऊर्जा लोकांकडे हस्तांतरित झाली आहे”, अशी प्रतिक्रिया ऋषभने दिली.
‘कांतारा : चाप्टर 1’ सध्या देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या सात दिवसांत या चित्रपटाने कमाईचा 300 कोटींचा टप्पा पार केला असून 400 कोटींकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. विशेष म्हणजे ‘कांतारा : चाप्टर 1’ने पहिल्या आठवड्यातच त्याच्या पहिल्या भागाच्या लाइफटाइम कलेक्शनचा आकडा पार केला आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ या चित्रपटाने भारतात 290 कोटी रुपयांची कमाई केली होती.
‘होम्बाले फिल्म्स’ बॅनरअंतर्गत निर्मित झालेला हा चित्रपट ‘कांतारा’चा प्रीक्वेल आहे. यामध्ये ऋषभ शेट्टीसोबतच रुक्मिणी वलंत, जयराम, गुलशन देवैया आणि प्रमोद शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. पहिल्या भागातील घटनांच्या एक हजार वर्षापूर्वी जे घडलं होतं, त्यावर आधारित या प्रीक्वेलची कथा आहे.