त्याने दोन बहिणींमुळेच….रोहित शेट्टीच्या घरावरील फायरिंग प्रकरणात धक्कदायक माहिती समोर!

रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आरोपीला पैशांची गरज होती, म्हणूनच त्याने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.

त्याने दोन बहिणींमुळेच....रोहित शेट्टीच्या घरावरील फायरिंग प्रकरणात धक्कदायक माहिती समोर!
rohit shetty
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 19, 2026 | 5:53 PM

Rohit Shetty House Firing : प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबई येथील जुहू बंगल्यावर फायरिंगची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी काही लोकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंतच्या चौकशीतून फायरिंग करणाऱ्यांचे थेट कनेक्शन बिश्नोई गँगपर्यंत असल्याचे समोर आले आहे. प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या घरावरदेखील गोळीबार प्रकरणात बिश्नोई गँगचेच कनेक्शन समोर आले होते. दरम्यान, आता केलेल्या नव्या तपासातून या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या माहितीमुळे बिश्नोई गँग तरुणांना कसे गुन्हेगारीकडे वळवते याचे धक्कादायक उदाहरणच समोर आले आहे.

नेमकी काय माहिती समोर आली आहे?

रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात तपासादरम्यान काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शुभम लोनकर व्यतिरिक्त आरजू बिश्नोई हा देखील अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. या प्रकरणात आरजू बिश्नोई आणि शुभम लोनकर यांना वाँटेड आरोपी घोषित करण्यात आले आहे. मुख्य आरोपी दीपक शर्मा याच्या कुटुंबात २ भाऊ आणि ३ बहिणी आहेत.

पैशांची गरज असल्यानेच गोळीबारास होकार

दीपक शर्मा याची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची आहे. त्याच्या लहान बहिणीचे गेल्या वर्षी लग्न झाले होते. त्या लग्नासाठी घर गहाण ठेवून त्याने कर्ज घेतले होते. दुसरी एक बहीण आजारी असल्यामुळे तिच्या पतीने तिला सोडले असून तिची जबाबदारीही दीपकवर आहे. पैशांची गरज असल्यामुळे दीपकने हा गुन्हा करण्यास होकार दिल्याचे तपासात समोर आले आहे. रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी दीपक चांगलाच घाबरला होता. त्यामुळे त्याने अगोदर मद्यपान केले आणि नंतर गोळीबार केला, असे तपासातून समोर आले आहे.

दिले जाणार होते एकूण तीन लाख रुपये

फायरिंगसाठी दीपक आणि त्याच्या तीन साथीदारांना एकूण ३ लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यातील ५०,००० रुपयांची पहिली किस्त आधीच देण्यात आली होती. अटक आरोपी सनीचे इन्स्टाग्राम अकाउंट तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. सुमित कुशवाहा यालाही सुरुवातीला शुभम लोनकर आणि आरजू बिश्नोई यांनी फायरिंगसाठी संपर्क केला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र काही कारणास्तव सुमितने हे काम केले नाही. तरीही तो पोलिसांच्या रडारवर असून त्याचे आरोपींशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.