अभिनेत्रीच्या जुळ्या मुली अडकल्या हिमाचलमध्ये; वीज नाही, नेटवर्क नाही, पूरस्थितीबद्दल व्यक्त केली चिंता

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या जुळ्या मुली आणि तिचे आई-वडील हिमाचल प्रदेशच्या पूरस्थितीत अडकले आहेत. याबद्दलची माहिती तिने खुद्द सोशल मीडियाद्वारे दिली. गेल्या तीन दिवसांपासून ते तिथे वीज आणि नेटवर्कशिवाय राहत असल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे.

अभिनेत्रीच्या जुळ्या मुली अडकल्या हिमाचलमध्ये; वीज नाही, नेटवर्क नाही, पूरस्थितीबद्दल व्यक्त केली चिंता
हिमाचलमधील पुरात अडकल्या अभिनेत्रीच्या जुळ्या मुली
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 05, 2025 | 11:37 AM

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैकने हिमाचल प्रदेशमधील पूरस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे तिच्या जुळ्या मुली आणि इतर कुटुंबीय हिमाचलमध्ये अडकल्याची माहिती तिने दिली. रुबिना ही मूळची हिमालची असून तिचे आईवडील आणि इतर कुटुंबीय तिथेच राहतात. कामासाठी मुंबईत राहावं लागत असल्याने रुबिनाच्या जुळ्या मुली त्यांच्या आजीसोबत हिमाचलमध्येच राहतात. गेल्या तीन दिवसांपासून मुली आणि आईवडील हिमाचलमधील फार्महाऊसमध्ये राहत असल्याचं तिने सांगितलं आहे. तिथे वीज आणि नेटवर्कसुद्धा नाहीये. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत रुबिनाने परिस्थिती सांगितली असून त्यांच्यासाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलंय.

या व्हिडीओमध्ये रुबिना म्हणाली, “लोकांना असा प्रश्न पडलाय की मी अद्याप हिमाचल प्रदेशमधील पूरस्थितीबद्दल का बोलत नाहीये? परंतु माझं स्वत:चं कुटुंब तिथे अडकलंय. माझ्या जुळ्या मुली कुटुंबीयांसोबत तिथे हार्महाऊसवर अडकल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून तिथे वीज नाहीये, मोबाइलला नेटवर्क नाहीये. ते सध्या सुरक्षित असले तरी तिथल्या परिस्थितीबद्दल मला सतत काळजी वाटते. अभिनव आणि मी त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु ते शक्य होत नाहीये. आम्ही चिंतेत आहोत. कारण गेल्या दोन आठवड्यांपासून मी आणि अभिनव आमची फ्लाइट रिशेड्युलवर रिशेड्युल करतोय. आम्हाला तिथे जाण्याची संधीच मिळत नाहीये. कधी कुठे दरड कोसळतेय तर कधी काही दुर्घटना घडतेय. मी स्वत: 15 दिवसांपूर्वी या परिस्थितीच अडकली होती.”

या व्हिडीओमध्ये रुबिनाने सांगितलं की ती सर्वांसाठी प्रार्थना करतेय. ती आणि तिचे कुटुंबीयसुद्धा याच समस्येचा सामना करत असल्याची माहिती तिने चाहत्यांना दिली. लवकरात लवकर परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी सतत प्रार्थना करत असल्याचं तिने सांगितलं आहे. याआधी रुबिनाने हिमाचल प्रदेशातील पुराचा तिचा अनुभव नेटकऱ्यांसोबत शेअर केला होता. मुसळधार पावसामुळे रस्ते, महामार्ग, शेत आणि बऱ्याच गोष्टी खराब झाल्याची माहिती तिने दिली होती.

रुबिनाने 2018 मध्ये अभिनव शुक्लाशी लग्न केलं. त्यानंतर 2023 मध्ये तिने जुळ्या मुलींना जन्म दिला. जीवा आणि इधा अशी तिच्या मुलींची नावं आहेत. सध्या रुबिना आणि अभिनव ‘पती पत्नी और पंगा 2’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.