“त्या बिचाऱ्या चोराचं आयुष्य माझ्यापेक्षा..”; चाकूहल्ला करणाऱ्यावर सैफ अली खानला आली दया
चाकूहल्ल्यानंतर अभिनेता सैफ अली खानने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो घडलेल्या घटनेबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. माझ्यावरील हल्ला काही पूर्वनियोजित नव्हता, असं सैफने यावेळी स्पष्ट केलं.

अभिनेता सैफ अली खानवर त्याच्यात राहत्या घरात 16 जानेवारीच्या मध्यरात्री एका चोराने चाकूहल्ला केला. सैफच्या घरात चोरीच्या उद्देशाने बांगलादेशी नागरिक शिरला होता. त्याच्यासोबत झालेल्या झटापटीत त्याने सैफवर चाकूने सहा वार केले. त्यापैकी दोन वार गंभीर होते. सर्जरीदरम्यान सैफच्या पाठीतून चाकूचा तुकडा काढण्यात आला होता. या घटनेनं संपूर्ण कलाविश्वात खळबळ उडाली होती. आता चाकूहल्ल्यानंतर सैफने पहिल्यांदा मुलाखत दिली आहे. ‘दिल्ली टाइम्स’ला दिलेल्या या मुलाखतीत सैफने घडलेल्या घटनेबाबत सविस्तरपणे सांगितलं. त्याचप्रमाणे चाकूहल्ल्यानंतर कोणती खबरदारी घेतली जाईल, याविषयीही त्याने खुलासा केला.
“चोरीला फसलेला प्रयत्न”
इतक्या मोठ्या घटनेनंतरही मुंबईतल्या राहत्या घरात सुरक्षेखातर कोणतीही शस्त्रे बाळगणार नसल्याचं सैफने या मुलाखतीत स्पष्ट केलं. त्यामागचं कारण सांगताना तो म्हणाला, “काहीच बदलणार नाही. हे पहा, जर तुम्ही ते करत बसलात… कारण माझ्या जीवाला धोका असल्याचं मला वाटत नाही. माझ्यावरील हल्ला काही पूर्वनियोजित नव्हता. मला वाटतं की तो फक्त एक चोरीचा प्रयत्न होता, जो फसला. माझ्यापेक्षा जास्त त्या बिचाऱ्या माणसाचं आयुष्य खराब झालंय.”
चोराशी कसा संवाद साधला असता?
चोर ज्या खोलीस शिरला होता, त्या खोलीत जर सैफ आधीपासूनच उपस्थित असता तर परिस्थिती वेगळी असती का, याबाबतही तो व्यक्त झाला. “मी आधी रुममधील लाइट्स लावले असते आणि त्याला विचारलं असतं की, मी कोण आहे हे तुला माहितीये का? आणि मग कदाचित तो म्हणाला असता, ओह शि….ट, मी चुकीच्या घरात शिकलो. नंतर मी त्याला चाकू खाली ठेवायला सांगून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता. पण एकंदर जे घडलं, ते राग, स्वत:चा बचाव आणि तडकाफडकी घेतलेल्या निर्णयाचा परिणाम होता. सर्वकाही खूप जलद गतीने घडलं होतं”, असं त्याने सांगितलं.
चाकूहल्ल्यानंतर सैफला रिक्षाने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर पाच तास सर्जरी झाली आणि सैफच्या पाठीतून अडीच इंचाचा चाकूचा तुकडा काढण्यात आला. सैफच्या मणक्याजवळ तो तुकडा रुतला होता. पाच दिवसांच्या उपचारानंतर सैफला 21 जानेवारी रोजी डिस्चार्ज मिळाला. सध्या या प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यांनी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद या बांगलादेशी नागरिकाला अटक केली आहे.
