घटस्फोट जाहीर केल्यानंतर ए. आर. रेहमान यांची पत्नी म्हणाली “माझं त्यांच्यावर खूप प्रेम..”

पत्नी सायरा बानूशी घटस्फोट जाहीर केल्यानंतर संगीतकार, गायक ए. आर. रेहमान यांचं नाव त्यांच्याच बँडमधल्या एका कलाकाराशी जोडलं जाऊ लागलंय. यावरून आता सायरा यांनी एक व्हॉइस नोट जारी केली आहे. त्याद्वारे त्यांनी चाहत्यांना विनंती केली आहे.

घटस्फोट जाहीर केल्यानंतर ए. आर. रेहमान यांची पत्नी म्हणाली माझं त्यांच्यावर खूप प्रेम..
A R Rahman and Saira Banu
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 25, 2024 | 8:32 AM

ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान यांनी 29 वर्षांच्या संसारानंतर पत्नी सायरा बानूला घटस्फोट देत असल्याचा निर्णय जाहीर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. हा घटस्फोट जाहीर करताना रेहमान आणि सायरा यांच्याकडून त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती चाहत्यांना करण्यात आली होती. मात्र एका योगायोगामुळे रेहमान यांच्यावर काही नेटकऱ्यांकडून प्रचंड टीका करण्यात येत आहे. हा योगायोग म्हणजे रेहमान यांच्याच बँडमधली बासवादक मोहिनी डे हिनेसुद्धा त्याचदिवशी तिच्या पतीसोबतचा घटस्फोट जाहीर केला होता. त्यामुळे रेहमान यांच्या घटस्फोटासाठी मोहिनी कारणीभूत असेल, असे अंदाज काही नेटकऱ्यांकडून वर्तवण्यात आले आणि त्यावरून बरीच टीकासुद्धा झाली. यामुळे पहिल्यांदाच रेहमान यांचं खासगी आयुष्य हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. या सर्व घडामोडींवर आता सायराने तिच्या पीआरच्या माध्यमातून एक व्हॉइस नोट जारी केली आहे.

सायरा सध्या मुंबईत असून गेल्या काही दिवसांपासून तब्येत बरी नसल्याचं तिने स्पष्ट केलं. त्यामुळे उपचारासाठी ती मुंबईत थांबली आहे. “ए. आर. रेहमान हे व्यक्ती म्हणून हिऱ्यासारखे आहेत. या जगातील ते सर्वोत्कृष्ट पुरुष आहेत. माझ्या आरोग्याच्या समस्यांमुळे मला चेन्नई सोडावं लागलं. चेन्नईत कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे त्याला हे शक्य झालं नसतं. मी युट्यूबर्स आणि तमिळ मीडियाला विनंती करते की त्यांनी त्यांच्याविरोधात काहीही वाईट बोलू नये. माझ्या आयुष्यात मी त्यांच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला. इतकं माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांचंही माझ्यावर आहे. त्यामुळे त्यांच्यावर चुकीचे आरोप करू नका”, असं सायराने या व्हॉइस नोटमध्ये म्हटलंय.

उपचारानंतर चेन्नईला परतेपर्यंत प्रतीक्षा करा, असंही तिने सांगितलं आहे. “आम्ही अद्याप काही अधिकृतरित्या जाहीर केलं नाही. त्यांच्या नावाची बदनामी करू नका. हे सर्व खूप मूर्खपणाचं आहे. रेहमान हे हिऱ्यासारखे आहेत”, असं ती या व्हॉइस नोटच्या अखेरीस म्हणाली. मंगळवारी रेहमान आणि सायरा यांनी त्यांची वकील वंदना शाह यांच्या माध्यमातून घटस्फोट जाहीर केला. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती.

‘लग्नाची तीस वर्षे गाठण्याची आमची आशा होती पण सर्व गोष्टींचा अनपेक्षित शेवट पहायला मिळतोय. आमच्या हृदयाच्या झालेल्या तुकड्यांच्या भाराने आज देवाचंही सिंहासन थरथर कापू शकतं. जरी हे तुकडे पुन्हा जोडता येत नसेल तरी या तुकड्यांमध्ये आम्ही आमच्या नात्याचा अर्थ शोधतोय’, अशी पोस्ट रेहमान यांनी लिहिली होती.