सगळ्याची सुरुवात फक्त एका फोटोमुळे, प्रकरण इतकं वाढलं की..; सोहैलच्या घटस्फोटाबाबत सलमानचा मोठा खुलासा

'अलायन्स' या शोमध्ये आलेल्या सलमान खानने त्याचा भाऊ सोहैल खानशी घटस्फोटाबाबत मोकळेपणे चर्चा केली. सोहैल आणि सीमाच्या घटस्फोटाची नेमकी सुरुवात कशामुळे झाली, याचाही खुलासा त्याने केला. तो नेमकं काय म्हणाला, ते सविस्तर वाचा..

सगळ्याची सुरुवात फक्त एका फोटोमुळे, प्रकरण इतकं वाढलं की..; सोहैलच्या घटस्फोटाबाबत सलमानचा मोठा खुलासा
सलमान खान, सोहैल खान-सीमा सजदेह
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 05, 2026 | 9:09 AM

प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘अलायन्स’ हा शो सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या शोचा ग्रँड फिनाले जवळ आला असताना बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खानने त्यात एण्ट्री घेतली. भाऊ सोहैल खानला पाठिंबा देण्यासाठी तो या शोमध्ये पोहोचला होता. यावेळी खान भावंडांमध्ये अत्यंत भावनिक संवाद झाला. या शोमध्ये सोहैलची पूर्व पत्नी सीमा सजदेहसुद्धा सहभागी झाली होती. तेव्हा सोहैलने घटस्फोटासाठी मीच जबाबदार आहे, असं म्हणत संपूर्ण दोष स्वत:वर घेतला होता. आता सलमान याविषयी त्याच्या भावासोबत मोकळेपणे व्यक्त झाला.

सलमान म्हणाला, “तर माझ्या प्रिय आणि महान भावाने सर्व दोष स्वत:वर घेतला आहे. पण एक भाऊ म्हणून मला माहीत आहे की त्याने किती प्रयत्न केले. जे जमलं नाही, ते जमलं नाही आणि ते ठीक आहे. पण त्यामुळे त्याला खूप मोठा धक्का बसला आहे. जर त्याचं लग्न झालं नसतं आणि त्याला मुलं नसती, तर परिस्थिती पूर्णपणे वेगळी असती. पण मग त्याच्या दोन मुलांसाठी तो सतत प्रयत्न करत राहिला. मला खात्री आहे की सीमानेही प्रयत्न केले असतील, पण त्याचा परिणाम त्याच्यावर झाला आणि आजही होतो.”

भावाच्या घटस्फोटाबद्दल काय म्हणाला सलमान?

यावेळी सलमानने हेदेखील उघड केलं की सोहेल आणि सीमा या शोमध्ये एकत्र सहभागी होण्याबद्दल त्याला सुरुवातीला खात्री नव्हती. “मला भीती वाटत होती की जर हे दोघं एकत्र आले तर काय… कारण एखादी गोष्ट संपली की ती तशीच राहू द्यावी”, असं मत त्याने मांडलं. पण शोमध्ये दोघंही अत्यंत समजूतदारपणे वागले, असं मिनी माथूरने स्पष्ट केलं. सोहैलसोबतच्या आणखी एका खासगी चर्चेदरम्यान सलमान घटस्फोटाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. संसार मोडल्याची जबाबदारी फक्त एकाच व्यक्तीची असू शकत नाही, असं तो भावाला म्हणाला.

सीमाच्या ‘विषारी’ या टिप्पणीवर सलमानची प्रतिक्रिया

“मुद्दा असा आहे की, तू काही प्रमाणात दोष स्वत:वर घेत आहेस, बरोबर? तुझं म्हणणं आहे की जे काही घडलंय ते कुठे तरी तुझ्या चुकीमुळे घडलंय. पण हे उघड आहे की प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. मला समजतंय की हा परस्पर संमतीने झालेला निर्णय होता, असं तू म्हणणार नाहीस. मी नुकतीच एक मुलाखत पाहिली, ज्यात सीमाने तुमच्या लग्नाला ‘टॉक्सिक’ (विषारी) असं म्हटलं होतं. त्यात ती म्हणाली की, एक जोडपं म्हणून तुमचं नातं विषारी होतं, ते चांगलं नव्हतं आणि तुमच्यात भांडणं होत होती, जी प्रत्येक जोडप्यात होतात. पण नात्यात राहायचं की सोडून जायचं, हा निर्णय तुमचा असतो. तुमचे पर्याय काहीही असोत, पण एक भाऊ म्हणून आम्ही काय पाहिलं हे मला माहीत आहे. तू किती प्रयत्न केलेस, हे मी अलविरा, अर्पिता.. आम्ही सर्वांनी पाहिलंय. सीमानेही प्रयत्न केले असतील. पण त्यावेळी नशीब म्हणा किंवा परिस्थिती म्हणा.. गोष्टी तुमच्या बाजूने नव्हत्या. तुम्ही शक्य तितके प्रयत्न केले”, असं सलमान म्हणाला.

सुरुवात कुठून झाली?

सोहैल आणि सीमा या दोघांमधील प्रकरण कसं चिघळलं याबद्दल बोलताना सलमान पुढे म्हणाला, “हे सगळं कुठून सुरू झालं, तर त्या एका फोटोपासून आणि मग ते वाढतच गेलं. परिस्थिती अधिकाधिक बिघडत गेली. अखेर ती अशा टप्प्यावर पोहोचली, जिथे तुम्ही ते थांबवू शकत नव्हता. तुम्ही स्वत:ला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला किंवा नात्यात राहण्याची कितीही इच्छा असली तरी जे घडत होतं ते तुम्ही थांबवू शकत नव्हता. आता हे प्रकरण संपलंय आणि तुमच्या दोघांमध्ये आता सर्व काही सामान्य झालंय, याचा मला आनंद आहे.”

सोहैल खान आणि सीमा सजदेह यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. 2022 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. सोहैल आणि सीमाला योहान आणि निर्वाण ही दोन मुलं आहेत. या दोन्ही मुलांचं संगोपन दोघं मिळून करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us