सेटवर अभिनेत्रीला जबरदस्ती दाखवला अश्लील व्हिडीओ, घाबरलेली अभिनेत्री, थेट सोडली इंडस्ट्री
चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, या अभिनेत्रीसोबत घडलेला विचित्र प्रकार. एका अभिनेत्याने नशेत मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ लावून अभिनेत्रीच्या मांडीवर ठेवलेला फोन. घाबरलेली अभिनेत्री. थेट इंडस्ट्रीच सोडली.

पंजाबी आणि साऊथ चित्रपटसृष्टीत काम केलेली अभिनेत्री संदीपा विर्क हिने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये इंडस्ट्रीतील धक्कादायक अनुभव सांगत मोठा खुलासा केला आहे. तिच्या वक्तव्यामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
संदीपाने सांगितले की, अभिनय क्षेत्रातील तिचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अनेक वाईट अनुभव, गैरवर्तन आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्यामुळे तिने सध्या इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
दारूच्या नशेत अभिनेत्याने फोन मांडीवर ठेवला
पॉडकास्टमध्ये बोलताना संदीपा विर्कने एका शूटिंगदरम्यान घडलेली धक्कादायक घटना सांगितली. ती म्हणाली की, एका चित्रपटाचे शूटिंग आणि फोटोशूट सुरू असताना सेटवरील एका अभिनेत्याने मद्यप्राशन केले होते. त्यावेळी ती सेटवर बसलेली असताना त्या अभिनेत्याने मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ सुरू करून तिच्या मांडीवर फोन ठेवला. हा प्रकार पाहून ती पूर्णपणे हादरली होती.
त्या क्षणी काय प्रतिक्रिया द्यावी हेच मला समजलं नाही. इंडस्ट्रीमध्ये इतकी घाणेरडी मानसिकता असलेले लोक आहेत हे पाहून धक्का बसला. अभिनेत्रीने आणखी एक गंभीर आरोप करत सांगितले की, त्या अभिनेत्याने चित्रपटात काम मिळवण्यासाठी तिच्यासमोर कॉम्प्रोमाइजची अट ठेवली होती. शूटिंगदरम्यान त्याने तिला हॉटेलमध्ये एकत्र राहण्याची मागणी केली होती. या सर्व प्रकारांमुळे ती मानसिकदृष्ट्या खूप त्रस्त झाली होती. संदीपाच्या मते, इंडस्ट्रीत अशा प्रकारच्या गोष्टी सामान्य मानल्या जातात हीच सर्वात धक्कादायक बाब आहे.
अशा वातावरणात काम करायचंच कशाला?
संदीपाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी सहन कराव्या लागत असतील तर अशा ठिकाणी काम करण्याची इच्छा उरत नाही. जर अशा प्रकारेच फिल्म्स कराव्या लागत असतील तर मग त्या करण्याची गरजच काय? जसं चाललंय तसंच ठीक आहे. या कटू अनुभवांमुळे संदीपा विर्कने सध्या मनोरंजन क्षेत्रापासून काही अंतर ठेवले आहे. तिच्या या धक्कादायक खुलाशामुळे पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीतील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आला आहे.
संदीपाच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले आहे. तर काहींनी मनोरंजन क्षेत्रातील अशा प्रकारच्या गैरवर्तनावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.