सांगलीच्या संस्थान गणपतीच्या विसर्जन सोहळ्याला अभिनेत्री भाग्यश्री अनुपस्थित, चर्चांना उधाण
सांगलीच्या मानाच्या गणपती पंचायत संस्थानच्या श्रींचं मोठ्या जल्लोषात विसर्जन करण्यात आलं. मात्र यावेळी अभिनेत्री भाग्यश्रीची अनुपस्थित ही चर्चेचा विषय ठरली.

सांगलीच्या मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या गणपती पंचायत संस्थानच्या गणरायाला मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गणपती पंचायत संस्थानचे अधिपती राजे विजयसिंह पटवर्धन आणि राणी राजलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत गणरायाची विसर्जन मिरवणूक पार पडली. पारंपरिक वाद्यांचा गजर, ढोल-ताशांचा निनाद आणि हजारो भाविकांच्या सहभागाने सांगली शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मात्र, यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत अभिनेत्री भाग्यश्री यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी दरबार हॉल येथे श्रींची विधिवत आरती पार पडली. सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या उपस्थितीत ही आरती करण्यात आली. यावेळी संस्थानचे अधिपती राजे विजयसिंह पटवर्धन, राणी राजलक्ष्मी तसेच मान्यवर उपस्थित होते.
आरतीनंतर गणरायाला लाकडी रथातून विसर्जन मिरवणुकीसाठी नेण्यात आले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि ढोल-ताशांच्या निनादात ही मिरवणूक पुढे सरकली. आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी हजारो सांगलीकर रस्त्यावर उतरले होते. भक्तांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत गणरायाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला.
अभिनेत्री भाग्यश्रीच्या अनुपस्थितीने चर्चेला उधाण
यंदाच्या गणेशोत्सवात अभिनेत्री भाग्यश्री यांच्या अनुपस्थितीने विशेष लक्ष वेधून घेतले. गणेश प्रतिष्ठापनेच्या दिवशी अभिनेत्री भाग्यश्री यांनी केलेली आरती आणि मंदिराच्या गाभाऱ्यातील प्रवेश यावरून पटवर्धन कुटुंबातील अंतर्गत मतभेद समोर आल्याची चर्चा रंगली होती.
पटवर्धन कुटुंबातील वारसाहक्काच्या वादाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मिरवणुकीत अभिनेत्री भाग्यश्री परंपरेप्रमाणे उपस्थित राहतील का, याकडे सांगलीकरांचे लक्ष लागले होते. दरवर्षीच्या परंपरेनुसार त्या मिरवणुकीत सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता.
मात्र, यंदाच्या मिरवणुकीत अभिनेत्री भाग्यश्री उपस्थित राहिल्या नाहीत. राजे विजयसिंहराजे पटवर्धन यांनी भाग्यश्री यांच्याबाबत घेतलेली भूमिका आणि त्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मिरवणुकीला अनुपस्थित राहणे पसंत केल्याचे सांगितले जात आहे. तथापि, त्यांच्या अनुपस्थितीचे नेमके कारण किंवा त्यांची अधिकृत भूमिका याबाबत स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
हजारो सांगलीकरांच्या उपस्थितीत गणरायाला निरोप
भक्तिमय वातावरणात आणि उत्साहाच्या जल्लोषात गणरायाला निरोप देण्यात आला. मात्र, गणेश प्रतिष्ठापनेच्या दिवसापासून चर्चेत असलेल्या पटवर्धन कुटुंबातील वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री भाग्यश्री यांच्या अनुपस्थितीने यंदाच्या विसर्जन मिरवणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले.
