
क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. साराने मॉडेल, वेलनेस उद्योजिका आणि पोषणतज्ज्ञ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 12 ऑक्टोबर 1997 रोजी तिचा जन्म झाला असून तिने लंडनमध्ये पोषणतज्ज्ञात शिक्षण घेतलं आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून तिने क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. इतकंच नव्हे तर सचिन तेंडुलकर फाऊंडेशनमध्ये ती संचालिकासुद्धा आहे. हे फाऊंडेशन क्रीडा, आरोग्य आणि शिक्षण उपक्रमांवर लक्ष केंद्रीत करतं. इन्स्टाग्रामवर साराचे 7.4 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सारा चांगली कमाई करते.
ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सारा एका इन्स्टाग्राम पोस्टमधून जवळपास 25 ते 30 लाख रुपये कमावते. त्यामुळे ती देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सपैकी एक आहे, असं म्हणायला हरकत नाही. साराची एकूण संपतत्ती जवळपास एक ते दीड कोटी रुपये इतकी आहे. विविध ब्रँड्सच्या जाहिराती, मॉडेलिंग आणि सारा प्लॅनर्स या ऑनलाइन स्टोअरमधून तिची कमाई होते. तिने अजिओ लक्स आणि लानीज यांसारख्या मोठ्या ब्रँड्ससोबत काम केलंय.
नुकतंच तिला टुरिझम ऑस्ट्रेलियाच्या जागतिक ‘130 दशलक्ष डॉलर्स’ मोहिमेसाठी भारतीय चेहरा म्हणून निवडण्यात आलं होतं. यावेळी सारा म्हणाली, “ऑस्ट्रेलियात असं काहीतरी नक्की आहे, जे मला सतत इथे बोलावत राहतं. इथे पुन्हा पुन्हा यायला मलाही आवडतंय. गजबजलेल्या शहरांपासून ते निवांत समुद्रकिनारे, वन्यजीवन.. अशा बऱ्याच गोष्टी पर्यटकांना इथे अनुभवायला मिळतात. ऑस्ट्रेलियात घालवलेल्या सुट्ट्यांमध्ये मी सर्फिंग, स्नॉर्किंग, विविध खाद्यपदार्थ, कॉफी कल्चर यांचा भरभरून आनंद घेतला.”
याव्यतिरिक्त सारा तेंडुलकरची स्वत:ची पिलाटेसची अकॅडमी आहे. मुंबईतील अंधेरीत तिची ही अकॅडमी आहे. नुकताच तिने आपला 28 वा वाढदिवस साजरा केला. या बर्थडे सेलिब्रेशनला तिचे जवळचे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी उपस्थित होते. यावेळी भाऊ अर्जुन तेंडुलकर आणि त्याची होणारी पत्नी सानिया चंडोकसुद्धा सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले.