सयाजी शिंदे रुग्णालयात दाखल; महिनाभरापूर्वीच झाली होती अँजियोप्लास्टी
अभिनेते सयाजी शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. फूड पॉइजनमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. महिनाभरापूर्वीच त्यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली होती.
मराठी, हिंदी आणि त्याचसोबत दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारे अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. सयाजी शिंदेंना फूड पॉइजन झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारानंतर त्यांची प्रकृती ठीक होताच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्याच महिन्यात त्यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली होती. सयाजी हे रुटीन चेकअपसाठी गेले असता त्यांच्या हृदयात ब्लॉकेज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली. आपल्या आरोग्याविषयीची माहिती त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे दिली होती. महिनाभरानंतर ते पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल झाल्याने चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली आहे.
अँजियोप्लास्टी झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयातूनच एक व्हिडीओ रेकॉर्ड करून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. “माझी प्रकृती आता ठीक आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना, शुभचिंतकांना मी सांगू इच्छितो की काळजी करू नका. मी लवकरच तुमच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. खबरदारी म्हणून मी डॉक्टरांकडे रुटीन चेकअपसाठी गेलो होते. तेव्हा त्यांना माझ्या हृदयात ब्लॉकेज आढळले. अँजियोप्लास्टीनंतर मी आता ठीक आहे. तुम्ही काळजी करू नका”, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या व्हिडीओवर सुभोध भावे, गजराज राव आणि सुनील ग्रोवर यांसारख्या कलाकारांनी कमेंट करत त्यांना लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
View this post on Instagram
सयाजी शिंदे यांनी तेलुगू, तमिळ, हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय. याविषयी ते एका मुलाखतीत म्हणाले होते, “बॉलिवूडमधील प्रत्येकजण आता असा विचार करतो की मी तेलुगू अभिनेता आहे आणि हिंदीत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. पण हिंदीत मिळणाऱ्या काही भूमिका मला आवडत नव्हत्या. त्याचप्रमाणे काही दिग्दर्शकांचं वागणंसुद्धा मला पटलं नव्हतं.”