Sunny Deol: ‘गदर’मध्ये मुस्लिमांना परकं दाखवलं, शबाना आझमींच्या टीकेवर सनी देओल स्पष्टच बोललेला ‘त्या सुशिक्षित असूनही..’
सनी देओल आणि शबाना आझमी हे बऱ्याच वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र आले आहेत. 2001 मध्ये 'गदर' या चित्रपटावरून दोघांमध्ये वाद झाला होता. शबाना आझमी यांनी सनीच्या या चित्रपटाला प्रक्षोभक असल्याचं म्हटलं होतं.

अभिनेता सनी देओल आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी हे ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. राजकुमार संतोषी दिग्दर्शित हा चित्रपट फाळणीवर आधारित आहे. या चित्रपटामुळे 2001 मधला या दोघांमधील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सनीच्या ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटावर शबाना आझमी यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेवर सनी देओलनेही तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. ‘गदर’ या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला होता. त्या काळातील हा सर्वांत मोठ्या यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला होता. मात्र अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाने फाळणी, राष्ट्रवाद आणि भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या चित्रणामुळे वादालाही तोंड फुटलं होतं.
शबाना आझमी यांनी त्यावेळी ‘गदर’ला प्रक्षोभक असं म्हटलं होतं. “फाळणीनंतर निर्माण झालेल्या वेदनेच्या गुंतागुंतीला सामोरं न जाता ‘गदर’ हा चित्रपट राष्ट्रवाद, धर्म आणि अस्मिता या मुद्द्यांमध्ये गोंधळ निर्माण करतो. हा चित्रपट प्रक्षोभक आणि मुस्लिमांना परकं म्हणून सादर करणारा आहे”, अशी टीका त्यांनी केली होती. यावर सनी देओलनेही रोखठोक प्रतिक्रिया दिली होती.
“शबाना आझमी यांच्या वक्तव्यामुळे मला खूप वाईट वाटलं. त्या सुशिक्षित आणि जाणकार आहेत, तरीही त्या चित्रपटाविरोधात भडकाऊ वक्तव्ये करत आहेत. ज्यांनी चित्रपटाबद्दल गदारोळ केला, ते फक्त चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत होते. गदरच्या यशाने हे सिद्ध केलं की त्यात काहीही चुकीचं नव्हतं. गदरच्या प्रेक्षकसंख्येनं त्याबद्दल नकारात्मक बोलणाऱ्या प्रत्येकाची तोंडं बंद केली आहेत. या चित्रपटाच्या कथेची पार्श्वभूमी फाळणीची होती, पण कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा वाद निर्माण करण्याचा कोणताही हेतू नव्हता. ज्यांना असं वाटतं की हा चित्रपट देशविरोधी आहे किंवा आम्ही धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यांची मनं विकृत आहेत”, अशा शब्दांत सनी देओल व्यक्त झाला होता.
आता दोन दशकांहून अधिक काळानंतर फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांनी एकत्र काम केलं.
