वय झालंय, रिटायरमेंट घे..; नेटकऱ्याने सल्ला देताच शाहरुख खानचं सडेतोड उत्तर, बोलतीच बंद!

शाहरुखने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं त्याने मजेशीर अंदाजात दिली आहेत. यादरम्यान एका युजरने शाहरुखला थेट रिटायर होण्याचा सल्ला दिला. त्यावर शाहरुखने सडेतोड उत्तर देऊन बोलतीच बंद केली.

वय झालंय, रिटायरमेंट घे..; नेटकऱ्याने सल्ला देताच शाहरुख खानचं सडेतोड उत्तर, बोलतीच बंद!
Shah Rukh Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 17, 2025 | 10:55 AM

बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान त्याच्या बेधडक अंदाजासाठी आणि विनोदबुद्धीसाठी ओळखला जातो. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या शाहरुखने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर #AskSRK सेशनद्वारे चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी काही नेटकऱ्यांनी त्याला अजब-गजब प्रश्न विचारले, ज्यांची किंग खानने त्याच्याच अंदाजात उत्तरं दिली आहेत. एका युजरने शाहरुखला थेट निवृत्त होण्याचा सल्ला दिला. त्यावर शाहरुखने दिलेल्या उत्तराची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. यावेळी त्याने खांद्याच्या दुखापतीविषयीही अपडेट दिली आहे. इतकंच नव्हे तर मुलगा आर्यन खानच्या आगामी वेब सीरिजबद्दलही तो मोकळेपणे व्यक्त झाला. आर्यनची ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

एका युजरने शाहरुखला विचारलं की त्याच्या खांद्याची दुखापत बरी झाली का? त्यावर शाहरुख म्हणाला, ‘मी स्टारडमचा भार खूप चांगल्याप्रकारे सहन करतोय. हाहाहाहा. माझ्या मित्रा, खांदा हळूहळू बरा होतोय. विचारपूस केल्याबद्दल धन्यवाद.’ शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटासाठी जेव्हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा त्याने आभार मानणारा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये शाहरुखच्या हातावर पट्टी बांधलेली दिसली होती.

या सेशनदरम्यान एका युजरने शाहरुखला थेट निवृत्तीचा सल्ला दिला. ‘भाऊ, तू आता म्हातारा झाला आहे, निवृत्ती घे. इतर मुलांना पुढे येऊ दे’, असं संबंधित नेटकऱ्याने लिहिलं होतं. त्यावर शाहरुखने उत्तर दिलं, ‘भावा, जेव्हा तुझ्या प्रश्नांचा बालिशपणा संपेल, तेव्हा एखादा चांगला प्रश्न विचार. तोपर्यंत कृपया तात्पुरत्या निवृत्तीत राहा.’ सोशल मीडियावर सध्या शाहरुखच्या याच उत्तराची जोरदार चर्चा आहे.

आणखी एका चाहत्याने शाहरुखला त्याचा मुलगा आर्यन खानच्या आगामी सीरिजबद्दल विचारलं. याविषयी माहिती देताना शाहरुखने लिहिलं, ‘इतके लोक त्याबद्दल विचारत आहेत, त्यामुळे नेटफ्लिक्सला सांगावं लागतंय की मुलगा शो बनवतोय, वडील फक्त त्याची वाट पाहत आहेत. नेटफ्लिक्स, तुम्ही काय करत आहात?’ शाहरुखने या ट्विटमध्ये नेटफ्लिक्सला टॅग केल्याने त्यांनीही उत्तर दिलंय. ‘मुलाचा टीझर पोस्ट करण्यापूर्वी वडिलांची परवानगी आवश्यक होती. फर्स्ट लूक उद्या येईल’, असं त्यांनी मजेशीर अंदाजात म्हटलंय.