
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळख असलेला अभिनेता शाहिद कपूर सध्या ‘कॉकटेल 2’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान त्याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘फर्जी 2’ या चित्रपटाशी संबंधित अपडेट समोर आली आहे. या सीरिजच्या शूटिंग आणि प्रदर्शनाच्या तारखेबाबत खुलासा झाला आहे. त्याचसोबत ‘फर्जी 2’साठी शाहिद कपूरने किती मानधन घेतलंय, त्याचीही माहिती समोर आली आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, शाहिद नवीन वर्षात म्हणजेच 2026 मध्ये ‘फर्जी 2’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या वेब सीरिजसाठी त्याने मोठी रक्कम वसूल केली आहे. शाहिदने ‘फर्जी 2’साठी त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमधील सर्वांत मोठी फी आकारल्याचं म्हटलं जात आहे.
सध्या ‘फर्जी 2’ची पटकथा लिहिली जात आहे. अॅमेझॉन प्राइम आणि राज-डीके या दिग्दर्शकाची जोडी मिळून जानेवारी 2026 पासून दुसऱ्या सिझनच्या शूटिंगची सुरुवात करणार आहेत. शाहिदने या शूटिंगसाठी सहा महिन्यांचा वेळ दिला आहे आणि त्यासाठी त्याला खूप चांगलं मानधन मिळालं आहे. शाहिदने ‘फर्जी 2’साठी तब्बल 40 कोटी रुपये फी घेतली आहे. शाहिदच्या करिअरमधील ही सर्वांत मोठी फी आहे. ‘फर्जी’च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच आता शाहिदने त्याच्या मानधनात वाढ केली आहे.
‘फर्जी 2’ ही वेब सीरिज 2026 मध्ये शेवटपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात किंवा 2027 च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होऊ शकते. हा दुसरा सिझन पहिल्या सिझनपेक्षा भव्यदिव्य असेल. प्रेक्षक ही सीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतील.
शाहिद कपूरच्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झाल्यास, तो ‘देवा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सध्या तो विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘ओ रोमिओ’मध्ये भूमिका साकारतोय. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहे. पुढच्या वर्षी व्हॅलेंटाइन डेनिमित्त 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ‘कॉकटेल 2’मध्ये तो रश्मिका मंदाना आणि क्रिती सेनॉनसोबत झळकणार आहे. हा चित्रपटसुद्धा पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल.