
Dharmendra Death : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती खालावलेली होती… त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. तेव्हा मित्राला भेटण्यासाठी अभिनेते शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या घरी पोहोचले होते. आजारी असताना देखील धर्मेंद्र हँडसम दिसत होते… असं वक्तव्य शत्रुघ्न सिन्हा यांनी केलं आहे. शिवाय एक्सवर त्यांनी एक भावूक पोस्ट देखील शेअर केली आहे.
धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी ‘लोहा’, ‘जीने नहीं दूंगा’, ‘ब्लॅकमेल’, ‘आग ही आग’, ‘हमसे ना टकराना’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी धर्मेंद्र यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत शेवटच्या दिवसांमध्ये त्यांची कशी अवस्था होती… याबद्दल सांगितलं आहे.
भावूक होत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘धर्मेंद्र हँडसम व्यक्ती होते… जेव्हा आमची जोडी एकत्र चालायची तेव्हा आम्ही ‘ब्यूटी अन्ड द बीस्ट’ दिसायचो… जेव्हा मी आणि माझी पत्नी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलेलो तेव्हा ते हसत होते… आजारी असून सुद्धा ते हँडसम दिसत होते… त्यांच्या चेहऱ्यावर तेज होता… ते बरे होतील असं वाटलं होतं… असा विचार देखील नव्हता करायचा ज्यावर आपण इतकं प्रेम करतो, तो या विश्वातून जाईल…’
शत्रुघ्न पुढे म्हणाले, ‘धर्मेंद्र आणि हेमा मालिनी दोघांसोबत माझे चांगले संबंध आहे… आता हेमा मालिनी यांची काय अवस्था असेल सांगू देखील शकत नाही… त्यांनी पूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीवर प्रेम केलं… माझ्यात आता इतकी हिंमत देखील नाही की, त्यांनी कॉल करुन विचारू शकेल…’
एक्सवर पोस्ट करत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘आमचे फॅमिली फ्रेंड… माझे मोठे भाऊ… लोकांचे हिरो… सर्वांचे चाहते… जमिनीने पूत्र… पंजाब आणि महाराष्ट्राची शान… खऱ्या अर्थाने भारत रत्न… जमिनीशी जोडलेले… दयाळू आणि विनम्र… धर्मेंद्र यांच्या निधनाने प्रचंड दुःख झालं होतं… त्यांचं महान योगदान कायम लक्षात ठेवलं जाईल… ‘ सध्या शत्रुघ्न सिन्हा यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.