
मुंबई : 13 फेब्रुवारी 2024 | बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानने इंडस्ट्रीत बऱ्याच कलाकारांना लाँच केलं. यापैकी काही कलाकारांना या इंडस्ट्रीत यश मिळालं, तर काही फक्त एक-दोन चित्रपटांपुरतेच मर्यादित राहिले. सलमानच्या ‘लकी : नो टाइम फॉर लव्ह’ या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री स्नेहा उल्लाल सध्या इंडस्ट्रीतून गायबच आहे. या चित्रपटानंतर ती फारशी कुठे झळकली नाही. मात्र सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर स्नेहाची तुलना पुन्हा एकदा अभिनेत्री ऐश्वर्या रायशी होऊ लागली आहे. स्नेहाने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तेव्हासुद्धा तिची तुलना ऐश्वर्याशी झाली होती. या दोघींचे डोळे आणि दिसणं एकसारखंच असल्याचं चाहत्यांनी म्हटलं होतं. मात्र इतक्या वर्षांत ऐश्वर्याचा लूक बराच बदलला आणि स्नेहा अजूनही तशीच असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
स्नेहाला एका रेस्टॉरंटबाहेर पापाराझींनी पाहिलं आणि यावेळी तिचे फोटो, व्हिडीओ क्लिक करण्यात आले. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. आराध्यापेक्षा हीच ऐश्वर्याची मुलगी वाटते, असं एकाने म्हटलंय. तर ऐश्वर्याची मुलगी अशी दिसायला हवी होती, पण ती वडिलांवर गेली, असं दुसऱ्या युजरने लिहिलंय. तर स्नेहा आणि ऐश्वर्याची तुलनाच होऊ शकत नाही, असंही काहींनी म्हटलंय. या व्हिडीओवर खुद्द स्नेहानेही कमेंट केली आहे. ‘तुमच्या प्रेमासाठी आणि द्वेषासाठी धन्यवाद’, असं तिने कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आहे.
स्नेहा उल्लालचा पहिला चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘लकी’ या चित्रपटामुळे ती बरीच चर्चेत आली होती. पण यानंतर तिने बॉलिवूडला निरोप दिला होता आणि ती पूर्णपणे गायब झाली होती. मध्यंतरीच्या काळात तिने काही तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं होतं. याविषयी ती एका मुलाखतीत म्हणाली होती, “मला एक गोष्ट स्पष्ट करायला आवडेल की, मला बॉलिवूडमध्ये परत जाण्याची गरज नाही. कारण जेव्हा आपण जाणूनबुजून काहीतरी सोडतो आणि तिथे परत येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते पुनरागमन असतं. परंतु, मी कधीही मनोरंजन विश्व सोडलेलं नाही. माझी तब्येत बिघडल्यामुळे मी चित्रपटांपासून दूर गेले होते.”
स्नेहाने पुढे असाही खुलासा केला होता की, तिला ‘ऑटोम्यून्यून डिसॉर्डर’ झाला होता. यामुळे ती इंडस्ट्रीपासून दूर गेली. आजारपणामुळे तिला 30 ते 40 मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभंदेखील राहता येत नव्हतं. स्नेहा बॉलिवूडपासून दूर गेली असली तरी सोशल मीडियावर ती बरीच सक्रीय असते.