शेफालीचं घटस्फोटानंतर कसं होतं पूर्व पतीशी नातं? अशी होती शेवटची भेट
अभिनेत्री शेफाली जरीवालाने हरमीत सिंहशी पहिलं लग्न केलं होतं. लग्नाच्या पाच वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला होता. आता शेफालीच्या निधनानंतर हरमीतने तिच्यासोबतच्या शेवटच्या भेटीची आठवण सांगितली आहे.

‘कांटा लगा’ या रिमिक्स गाण्यातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचं 27 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. शेफालीच्या निधनाने तिच्या कुटुंबीयांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला. वयाच्या 42 वर्षी तिने या जगाचा अखेरचा निरोप घेतला. अनेक कलाकारांनी शेफालीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आता तिचा पूर्व पती हरमीत सिंहचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. शेफालीने ‘मीत ब्रदर्स’ या संगीतकार जोडीतील हरमीत सिंहशी पहिलं लग्न केलं होतं. परंतु लग्नाच्या पाच वर्षांतच दोघं विभक्त झाले. घटस्फोटानंतर शेफालीशी कसं नातं होतं आणि तिच्याशी शेवटची भेट कधी झाली होती, याविषयी हरमीतने या मुलाखतीत सांगितलं.
विक्की ललवानीला दिलेल्या मुलाखतीत हरमीत म्हणाला, “दोन-तीन वर्षांपूर्वी आम्ही एका शोनिमित्त बांग्लादेशला एकत्र गेलो होतो. आमच्यासोबत सनी लिओनीसुद्धा होती. मी आणि शेफाली एकमेकांच्या शेजारीच बसलो होतो. त्यावेळी आम्ही तासनतान गप्पा मारल्या होत्या. आम्ही घटस्फोटानंतर जेव्हा कधी एकमेकांना भेटलो, तेव्हा प्रेमानेच वागलो. परंतु आता सत्य हेच आहे की शेफाली आता आपल्यात नाही.” शेफालीच्या निधनानंतर हरमीतने सोशल मीडियावर पोस्ट लिहित दु:ख व्यक्त केलं होतं.
View this post on Instagram
हरमीत आणि शेफाली यांनी 2004 मध्ये लग्न केलं होतं. तर 2009 मध्ये ते अधिकृतरित्या विभक्त झाले होते. त्यानंतर शेफालीने अभिनेता पराग त्यागीशी दुसरं लग्न केलं. परागशी लग्नानंतर शेफाली बाळासाठी खूप प्रयत्न करत होती. परंतु त्यात तिला यश मिळालं नाही. याविषयी ती एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली होती. “मी आणि पराग बऱ्याच काळापासून बाळ दत्तक घेण्याचा विचार करत होतो. मात्र तेही शक्य होत नव्हतं. त्यात कायदेशीर अडचणी बऱ्याच येत होत्या. माझ्या आणि परागच्या वयात फार अंतर आहे. त्यामुळे मी आई होऊ शकली नाही. गर्भधारणेत मला बऱ्याच समस्या आल्या. आम्ही दोघांनी बाळासाठी सर्व प्रयत्न केले. आता असं वाटतं जे आमच्या नशिबात असेल ते होईल”, असं पुढे म्हणाली होती.
शेफाली अंधेरीच्या लोखंडवाला संकुलात पती पराग त्यागीसह राहत होती. शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास तिला हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारासाठी शेफालीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाने तिला मृत घोषित केलं.
