
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग महत्त्वाच्या भूमिकेत असलेला ‘धुरंधर’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. संपूर्ण देशात या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळते. सामान्य प्रेक्षकांपासून ते मोठमोठ्या स्टार्सपर्यंत, अनेक जण आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाची प्रशंसा करत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तर तुफान कमाई केली आहे. अलीकडेच अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही सिनेमागृहात जाऊन ‘धुरंधर’ हा सिनेमा पाहिला आहे. त्यानंतर तिने जी काही प्रतिक्रिया दिली ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
श्रद्धा कपूरने धुरंधर चित्रपट पाहून प्रशंसा केली आहे. त्यासोबतच सीक्वल पाहण्याची उत्सुकता असल्याचे देखील म्हटले आहे. श्रद्धा कपूरने ‘धुरंधर’ बद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक नव्हे तर तीन पोस्ट्स शेअर केल्या आहेत. तसेच चित्रपटावर, निर्मात्यांवर टीका करणाऱ्यांनाही चांगलेच सुनावले आहे. ती म्हणाली की ती दुसऱ्यांदा चित्रपट पाहायला जात होती, पण सकाळच्या शूटिंगमुळे तसे करू शकली नाही.
श्रद्धा कपूर काय म्हणाली?
आपल्या पहिल्या इंस्टाग्राम स्टोरीत श्रद्धा कपूर म्हणाली की, “@adityadharfilmsचा ‘धुरंधर’सारखा सिनेमा खूप जबरदस्त आहे.” दुसऱ्या पोस्टमध्ये ती म्हणाली, “आणि मग पार्ट २ साठी आम्हाला ३ महिने वाट पाहायला लावत आहेत. आमच्या इमोशन्सशी खेळू नका, प्लीज रिलीज थोडे लवकर करा. काय शानदार अनुभव होता. जर माझे सकाळची शूटिंग नसते तर खरंच मी आता दुसऱ्यांदा पाहायला गेले असते. छावा, सैयारा, धुरंधर… सर्व २०२५ मध्ये… हिंदी सिनेमा” आणि यासोबत तीन रॉकेट इमोजी वापरले होते.
आपल्या शेवटच्या इंस्टाग्राम स्टोरीत श्रद्धा कपूरने ‘धुरंधर’वर टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. “@yamigautam पासून ते मोठ्या प्रमाणात नेगेटिव्ह, टॅक्टिक्स पीआर आणि उगाच वादात ओढण्यापर्यंत, ‘धुरंधर’ने सर्व सहन केले आणि जिंकून सिनेमाला पुढे आणले. कोणतीही नेगेटिव्ह शक्ती एका उत्तम फिल्मला छोटे करू शकत नाही. आम्हाला प्रेक्षकांवर विश्वास आहे” या आशयाची पोस्ट श्रद्धाने केली.
धुरंधर चित्रपटाविषयी
‘धुरंधर’ चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडत आहे. ५ डिसेंबरला रिलीज झाल्यानंतर चित्रपटाने ३७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, राकेश बेदी, दानिश पंडोर, गौरव गेरा, सौम्या टंडन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘धुरंधर’चा सीक्वल १९ मार्च २०२६ रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.